
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दिल्लीत निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. मंगळवारी मुंबईत रंगपंचमी खेळल्यानंतर ते कौटुंबिक स्नेहमेळाव्यासाठी दिल्लीला गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार दशके विनोदाच्या अचूक टायमिंगने आणि सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांना हसवणाऱ्या ‘कॅलेंडर’ने आज चाहत्यांना रडवले. पोस्टमॉर्टमनंतर कौशिक यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. गुरुवारी वर्सोवा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. कौशिक यांच्या निधनाबद्दल अवघ्या बॉलीवूडमधून शोक व्यक्त होत आहे.
सतीश कौशिक यांचे होळी सेलिब्रेशनचे फो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आज त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना धक्का बसला. त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते झोपण्यासाठी निघून गेले. मात्र सव्वाबारा वाजता त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत आहे असा फोन मॅनेजर संतोष राय यांना केला. त्यानंतर राय यांनी लगेच कौशिक यांना रुग्णालयात हलवले.
अनेक बॉलीवूड कलाकारांनी सतीश कौशिक यांच्या आठवणी आणि फोटो शेअर करून त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. कौशिक यांचे पार्थिव वर्सोवा येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अनुपम खेर, जॉनी लिव्हर, राकेश रोशन, रझा मुराद, बोनी कपूर, संजय कपूर, अर्जुन कपूर, विक्रांत मेस्सी आदींनी कौशिक यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. कौशिक यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
‘मिस्टर इंडिया’पासून मिळाली ओळख
सतीशचंद्र कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरयाणामध्ये झाला. ते ‘एनएसडी’चे विद्यार्थी. 1983 साली आलेल्या ‘जाने भी दो यारो’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याआधी हिंदी रंगभूमी गाजवली होती. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील ‘कॅलेंडर’ या भूमिकेने त्यांना ओळख दिली. त्यानंतर ‘दिवाना-मस्ताना’मधील त्यांची ‘पप्पू पेजर’ ही भूमिकाही गाजली. 1990 मध्ये ‘राम-लखन’ आणि 1997 मध्ये ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट हास्य अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. वो सात दिन, मासूम, मंडी, उडान, उत्सव, सागर, मोहब्बत, काश, उत्तर दक्षिण, ठिकाणा, जलवा, एक नया रिश्ता, राम लखन, वर्दी, जोशिले, प्रेम प्रतिग्या, आग से खेलेंगे अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘हम आप के दिल में रहते है’, ‘बधाई हो बधाई’, ‘तेरे नाम’ आदी चित्रपटांचे कौशिक यांनी दिग्दर्शन केले होते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘शर्माजी नमकीन’ आणि या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘छत्रीवाली’ आणि ‘इमर्जन्सी’ चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
























































