
>>दिलीप जोशी
आपल्या बालपणापासून आपल्याला कवितेतून परिचित असलेल्या आणि कवी-नाटककार म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या घरी पुस्तकाचं अनावरण प्रसंगी झालेली भेट आणि नंतरच्या गप्पा सांगणारे हे ध्वीनमुद्रण माझ्या ‘संचिता’चा एक महत्त्वाचा भाग आहे.
कविवर्य ‘कुसुमाग्रज’ यांची ओळख तशी अगदी बालपणीच झाली होती ती पहिलीच्या मराठी पुस्तकातून. ‘उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही’ ही बालकविता महाराष्ट्रातील अनेक पिढय़ांनी वर्गात म्हटली असेल. त्यावेळी आईने कवीनामाबद्दल सांगितलं, कवीच्या लहान बहिणीचं नाव कुसुम आणि तिचा ‘अग्रज’ म्हणजे मोठा भाऊ ‘कुसुमाग्रज’.
कालांतराने ‘कुसुमाग्रजां’चं खरं नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे हे समजलं. खरं तर त्यांचं जन्मनाव होतं गजानन रंगनाथ शिरवाडकर. त्यांचा जन्म 1912 मधला. खूप उशिरा म्हणजे 1930 मध्ये दत्तक गेल्याने त्यांचं नाव बदललं आणि वि. वा. शिरवाडकर असं झालं. ‘विशाखा’ या काव्यसंग्रहातल्या ओजस्वी कवितांपैकी ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार, अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार’ ही कविता त्या काळात राष्ट्रीय चळवळीतल्या तरुणांना विलक्षण स्फूर्ती देणारी ठरली. स्वतः शिरवाडकर यांनीही केवळ काव्य लिहून समाधान मानलं नाही, तर विविध राजकीय आणि सामाजिक आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला. नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱया सत्याग्रहात तरुण शिरवाडकर सामील झाले.
सोळा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले कवी कुसुमाग्रज नाटककार वि. वा. शिरवाडकर म्हणून गाजले ते ‘नटसम्राट’ या त्यांच्या अपूर्व कलाकृतीमुळे. त्यातले ‘कुणी घर देता का घर’सारखे गद्यकाव्यच असलेले प्रदीर्घ स्वगत आजही अनेकांना अभिनयाचे आव्हान देतं. डॉ. श्रीराम लागू यांनी केलेली ‘नटसम्राट गणपतराव बेलवलकर’ ही भूमिका अद्वितीय ठरली. याशिवाय ‘ययाती देवयानी’, ‘वीज म्हणाली धरतीला’ ही तात्यासाहेब शिरवाडकरांची नाटकं खूप गाजली. चतुरस्र लेखक आणि सिद्धहस्त कवी ही त्यांची लोकप्रिय प्रतिमा. मात्र त्यांनी कधीकाळी पत्रकारिताही केली होती. साप्ताहिक ‘प्रभा’, दैनिक ‘प्रभात’ तसंच ‘सारथी’, ‘धनुर्धारी’, आचार्य अत्रे यांचं ‘नवयुग’ अशा विविध नियतकालिकांमध्ये लेखन केलेल्या शिरवाडकरांनी ‘स्वदेश’चं संपादकपदही भूषविलं होतं.
त्यांच्या साहित्यसेवेचा उचित सन्मान वेळोवेळी झाला. 1970 मध्ये नाटय़संमेलनाचे अध्यक्ष झाले. 1974 मध्ये साहित्य ऍकेडमी तर 1991 मध्ये ‘पद्मभूषण’ सन्मान त्यांना लाभले. त्याही पूर्वी 1964 मध्ये मडगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं होतं आणि त्यांच्या समग्र वाङ्मयसेवेचा गौरव झाला तो 1987 मध्ये ‘ज्ञानपीठ’ हा देशपातळीवरचा पुरस्कार प्राप्त झाल्यावर.
यानंतरच्या काळातच एकदा थेट कुसुमाग्रजांच्या घरी जाण्याचा योग आला. माझ्या मामी शुभदा खाडिलकर यांनी लिहिलेल्या प्रबंधाच्या पुस्तकाचं अनावरण करण्याच्या सोहळय़ासाठी आम्ही मुंबईहून नाशिकला गेलो. सकाळी 11 च्या सुमारास झालेल्या या समारंभाला आम्ही काही नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होतो. माझा मित्र रवींद्र कदम व्हिडीओ चित्रण करीत होता. थोडय़ाच वेळात तिथे नाटककार वसंत कानेटकरही आले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मला करायचं होतं. दोन दिग्गजांसमोर बोलण्याची ही पहिलीच वेळ. ‘आपल्या बालपणापासून आपल्याला कवितेतून परिचित असलेल्या आणि कवी-नाटककार म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या घरी आज आपण जमलो आहोत ही आनंदाची गोष्ट आहे.’ यावर कवी त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार मंद हसत हळूच म्हणाले, ‘स्वागत आहे तुमचं.’
मग सारा समारंभ तासाभरात झाला. कार्यक्रमाचं चित्रण करण्याची कल्पना प्रत्यक्षात आली. कारण तोपर्यंत ‘व्हीएचएस’ कॅमेरे सर्वत्र उपलब्ध झाले होते. त्याआधीच्या अनेक दुर्मिळ मुलाखती, गाठीभेटी मी केवळ टेपरेकॉर्डरवर ध्वनिमुद्रित केल्या होत्या. ज्या काळात हे रेकॉर्डिंग केलं त्या काळातल्या म्हणजे गेल्या तीस-चाळीस वर्षांपूर्वीच्या ध्वनिमुद्रण आणि चित्रमुद्रणाच्या मर्यादा लक्षात घेता त्यात ‘क्वालिटी लॉस’ झाला असला तरी पुढे ते सारं ‘डिजिटाइज’ केल्याने बराचसा भाग चांगला राहिला आहे. परवा 10 मार्च रोजी कुसुमाग्रजांची पुण्यतिथी होती आणि त्यापूर्वी 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा झाला. यानिमित्ताने त्यांच्या घरी झालेली भेट आणि नंतरच्या गप्पा आठवल्या. ‘संचिता’चा तो एक महत्त्वाचा भाग आहे.





























































