‘संतापकीय’ निमाले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> डॉ. सच्चिदानंद शेवडे

इंदूरस्थित उत्तम कवी, रांगोळीकार, गझलकार, संपादक, साहित्यिक, आयोजक, मराठीत नव्या शब्दांची भर घालणारे आणि सुलेखनकार श्रीकृष्ण बेडेकर यांचे वृद्धापकाळामुळे नुकतेच निधन झाले.

श्रीकृष्ण बेडेकर हे मूळचे मुंबईकर होते. पुढे ते शिक्षणानिमित्त मध्य प्रदेशात गेले व इंदूरला स्थायिक झाले. तिथे ‘नई दुनिया’सारख्या मोठय़ा वृत्तपत्र समूहात नोकरी केली. फार काळ नोकरीत रमणे हा त्यांचा स्वभाव नसल्याने काही काळ नोकऱया करून त्यांनी अॅडव्हर्टायझिंग कंपनी काढली. पुढे 1994 मध्ये जान्हवी प्रकाशनची स्थापना करून डॉ. प्रभा अत्रे यांच्या दोनशे बंदिशींचा संग्रह प्रकाशित केला. त्या ‘स्वरांगिनी’ या संग्रहाच्या अभिप्रायासाठी त्यांनी पत्रसारांश या त्यांच्या नियतकालिकाचा ‘स्वरसाधना’ हा विशेषांक काढला.

आंतरदेशीय पत्रावर ‘पत्रसारांश’ नामक नियतकालिक चालवण्याचा अभिनव प्रकार त्यांनी केला. यात अनेक साहित्यिकांची साथ मिळाली. यातील काही वेळा तिरकस असणारे त्यांचे ‘संतापकीय’ अनेकांना आवडले. ‘संपादकीय’ या शब्दाच्या ऐवजी ‘संतापकीय’ हा खास त्यांचा शब्द होय. त्याची एक झलक देतो.

‘आपकी नजरो ने समझा प्यार के काबील मुझे’ हे माला सिन्हाच्या तोंडचे, पण लतादीदींनी गायलेले आणि गाजलेले गीत ऐकताना आम्हाला कधीच काही खटकले नाही. कारण आपण गाणी नुसतीच ऐकतो अथवा पडद्यावर पाहतो व विसरून जातो.

अशा वेळी सावरकरांचे ‘‘अन्य भारतीय भाषाभगिनींपैकी एक म्हणून आम्ही उर्दूचा यथोचित सन्मान करू, पण तिने आपली मर्यादा ओलांडून आम्हाला डोईजड ठरू नये’’ हे मत आठवते. एक अनपढ सोज्वळ हिंदू स्त्री गाण्यात ‘बंदा परवर शुक्रिया’ कसे म्हणेल? नजर, काबील, मंजूर, फैसला आदी उर्दू शब्द तिला कसे ठाऊक असतील हा विचार ना गीतकाराने केला आणि ना गायिकेने केला.

गेली 58 वर्षे सातत्याने अतिशय कसदार कविता लेखन करणाऱ्या बेडेकरांचे आतापर्यंत ‘अंतर्याम’ व ‘आत्मनाद’ हे दोनच काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांची काही गाणी रेडिओवर वाजली होती. त्यांच्या अनेक गेय कविता अनुराधा पौडवाल, अरुण दाते, राणी वर्मा आदी गायकांनी गायल्या. अलीकडे त्यांचा ‘आत्मनाद’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या मनोगतातून आणि भालचंद्र गुजर यांच्यासोबतच्या चर्चेतून मराठी भाषेविषयीची तळमळ आणि प्रगल्भ जाणिवा उलगडत जातात. संग्रहात प्रामुख्याने गझला असून भावगीते, लावण्या व अभंगही समाविष्ट आहेत. मंगेश पाडगावकर आणि शिरीष पै यांच्या प्रस्तावनांनी हा संग्रह सजला आहे.

‘शब्ददर्वळ’ या दिवाळी अंकासाठी ते सातत्याने वेगळे विषय निवडत असत. ‘पत्रसारांश’ हे नियतकालिक बंद करून त्यांनी त्याच नावाचे प्रतिष्ठान स्थापले. या प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी दोन दिवाळी अंकांना पुरस्कार दिले जात असत. शक्यतो महाराष्ट्रातील विविध शहरांत वा जिह्यांत पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम होत असे. बहुतेक वेळा पुरस्कारप्राप्त अंक जिथून प्रकाशित होत असे, तिथेच हा कार्यक्रम करण्याची त्यांची धडपड असे. वयोमानानुसार ही धावपळ करणे कठीण होताच त्यांनी 2019 मध्ये अखेरचे, एकविसावे ‘गुणवैभव’ पुरस्कार प्रदान आमच्या हस्ते इंदूरमध्ये केले. 2018 च्या ‘थिंक पॉझिटिव्ह’ व ‘अमितव’ या अंकांना पुरस्कार देण्यात आले होते. यमाजी मालकर व डॉ. मनीषा जगताप हे पुरस्कारप्राप्त संपादक त्यासाठी आले होते. कार्यक्रमात व्याख्यानही अंतर्भूत असल्याने आणि तो दिवस ‘कश्मिरी बलिदान दिवस’ असल्यामुळे बेडेकरांच्या आग्रहास्तव आम्ही ‘कश्मीर’ हा विषय हिंदी व मराठीतून मांडला.

सतत काहीतरी नवीन करण्याच्या स्वभावामुळे 2022 मध्ये त्यांनी वृत्तबद्ध कवितांना पुरस्कार जाहीर केला व पुरस्कारप्राप्त कविता दिवाळी अंकात प्रकाशित केल्या.

‘इत्थंभूत’ हा त्यांच्यावरील गौरवग्रंथ त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त पुण्यात प्रकाशित होणार होता. त्याला कोविडची दृष्ट लागली. अखेर ते लांबलेले प्रकाशन गतवर्षी पुण्यात झाले.
असा हरहुन्नरी कलाकार होणे विरळच.

[email protected]