
‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचार्यांअभावी सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला असून, शिक्षकांअभावी शाळा ओस पडल्या आहेत. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या घाटी रुग्णालयातील सर्व शस्त्रक्रिया संपामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अंबाजोगाईचे स्वाराती, नांदेड येथील गुरू गोविंदसिंहजी रुग्णालयातही हेच चित्र होते.
जुनी पेन्शन, सातव्या वेतन आयोगातील तफावत दूर करणे, वेतनश्रेणीतील त्रुटी भरून काढणे आदी मागण्यांसाठी राज्यातील लाखो कर्मचार्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचारी संघटनांची बैठकही घेतली; परंतु ती वांझोटीच ठरली. त्यामुळे आजपासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात राज्य महसूल कर्मचारी संघटना, राज्य तलाठी संघ, शासकीय-निमशासकीय कर्मचारी, खासगी प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, कृषी, समाजकल्याण कर्मचारी सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास 40 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. जिल्हा परिषद, घाटी रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालये संपामुळे ओस पडली होती. जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचार्यांनी उग्र निदर्शने केली. तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 10 हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. ‘राज्यातील सरकारचे करायचे काय.. खाली डोके वर पाय…’, ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, ‘आमदार, खासदारांची पेन्शन बंद करा’, ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा गगनभेदी घोषणांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.
बीड जिल्ह्यात पेन्शनसाठी सर्वच शासकीय, निमशासकीय विभागातील कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आजपासून पुकारलेल्या संपात बीड जिल्ह्यातील महसूल, आरोग्य नगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर विभागांतील एकूण 16 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. कर्मचार्यांच्या संपामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात 15 हजार कर्मचारी आजपासून पुकारलेल्या संपात शिक्षकही सामील झाले आहेत. कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गोंधळी, संबळ, परडी व झांज पाजळलेला पोत आदी वेश परिधान केलेल्या कर्मचार्यांनी गोंधळ गीतांद्वारे जुन्या पेन्शनची मागणी ताल-सुरात सादर केली.
लातूर जिल्ह्यात जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी शासकीय-निमशासकीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, लातूरच्या वतीने जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ अशा घोषणा देत जिल्ह्यातील तालुक्यात १७ हजार कर्मचार्यांनी मोर्चा काढत संपात सहभाग नोंदविला. त्यामुळे सर्व प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
परभणी जिल्ह्यात एकूण 18 कर्मचारी संघटनांनी संपात सहभाग घेत आपल्या मागण्यांसाठी घोषणा दिल्या. यावेळी जिल्ह्यातील 60 विभागांतील 12 हजार कर्मचारी सहभागी झाले होते. जालना जिल्ह्यातील 10 हजारांच्यावर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचार्यांनी प्रचंड मोठा मोर्चाही काढला.
सरकारी रुग्णालयांमध्ये बेहाल
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आरोग्य कर्मचारीही संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये बेहाल बघायला मिळाले. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी रुग्णालयांमधील महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. घाटी, स्वाराती तसेच गुरू गोविंदसिंहजी या मोठ्या रुग्णालयांमधील अपघात विभागातही शुकशुकाट होता.


























































