
आडे पाडले मंदिरासमोरील डोंगराला मोठी आडवी भेग पडली आहे.या भेगीचा विस्तार वाढत चालल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दापोली तालुक्यात आडे पाडले येथे श्री भार्गवराम या देवतेचे मंदिर आहे. 74 गुंठे महसूल क्षेत्र विस्तारलेल्या या देवरहाटीतील भार्गवराम देवतेच्या मंदिराच्या आवारात मुख्य देवतेसह रेणुका मंदिर, शंकर मंदिर,गणपती मंदिर,मारुती मंदिर,वेताळ मंदिर आणि शनिदेवाचे मंदिर अशी एकूण वेगवेगळी 7 मंदिरे आहेत.या मंदिराच्या समोर असलेल्या डोंगराला वणवा लागला होता.या वणव्यात येथील सर्व झाडे भस्मसात झाली आहेत. याआधीच निसर्ग चक्रीवादळामुळे या ठिकाणची नैसर्गिक हानी झाली होती. अजूनही या ठिकाणी नैसर्गिक हानी होत आहे.
तालुक्यातील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात अक्षय तृतियेला मोठा उत्सव भरतो.मंदिर परिसरातील डोंगराला भेग पडून तिचा विस्तार वाढल्यामुळे रहिवाशी घाबरले आहेत. येथून जवळच असलेल्या हर्णे राजवाडी येथील डोंगराचे भुस्खलन होऊऩ काही कुटुंबे जमिनीखाली जिवंत गाडली गेली होती.दाभोळ येथे राहणाऱ्या महाडिक परिवाराबाबत असाच प्रसंग घडला होता. त्यातच भर उन्हाळ्यात डोंगराला भेग पडण्याची घटना घडल्यामुळे पावसाळ्यात काय होईल, अशी चिंता येथील रहिवाशांना सतावत आहे. डोंगराला आडवी भेग पडण्याचे कारण हे भू वैज्ञानिकांद्वारे स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
या मंदिराच्या खालून दापोलीकडून येणारा केळशीकडे जाणारा दळवळणासाठी पक्का डांबरी रस्ता आहे. या रस्त्याला लागूनच आडे महसूली गावातील अजित बेहेरे, निशिकांत बेहेरे, विकास गुरव भरत गुरव,परांजपे आणि दिपक गुहागरकर तर पाडल्याच्या हद्दीत शिर्के आळी येथील हुमणे, धावरे आणि धाडवे यांची घरे आहेत.या सर्व घरांनाही डोंगर भूस्खलनाचा धोका आहे. त्यामुळे महसूल विभागाने याची तातडीने दखल घ्यावी. डोंराला पडलेली भेग नेमकी कशामुळे पडली आहे, याचे नेमके कारण काय आहे, याचा शास्त्रज्ञांकरवी उलगडा करून रहिवाशांच्या मनातली भीती काढून टाकावी, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
भार्गवराम मंदिरासमोरील डोंगराला पडलेल्या आडव्या भेगेची छायाचित्रे समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहेत. पाडले ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र सातनाक यांनी याबाबत तातडीने शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. डोंगराला पडलेल्या भेगीची पाहणी करण्याची विनंती केली. त्यानुसार, महसूल विभागाकडून तातडीने तलाठी राहुल जाधव यांनी स्थानिक आडे पाडले येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत डोंगराची पाहणी करून अहवाल तहसीलदारांकडे पाठवला, मात्र या अहवालात सादर केलेली माहिती अद्याप कळू शकली नाही.
























































