मोठय़ा भावाला मेसेज पाठवून तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठय़ा भावाला मेसेज करून लहान भावाने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना महाबळेश्वर तालुक्यातील मेटतळे येथे बुधवारी पहाटे उघडकीला आली आहे. दरम्यान, तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. किरण दत्तात्रय शिंगरे (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे. किरणचा मोठा भाऊ गणेश दत्तात्रय शिंगरे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

किरण हा महाबळेश्वर मध्ये खासगी नोकरी करत होता. मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर किरण आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. सकाळी किरणचा मोठा भाऊ गणेश मोबाईलमधील मेसेज बघत असताना रात्री 11.39 वाजता किरणने त्याला ‘सॉरी दादा, मी माझ्या आयुष्याला वैतागलो असून, आपल्याला अनेक अडचणी आहेत. पप्पांना सॉरी सांग, मिस यू’ असा मेसेज केल्याचे दिसून आले. मेसेज वाचताच गणेशने किरणच्या खोलीकडे धाव घेतली त्याला आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला असता, किरणने घरातील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती महाबळेश्वर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन किरणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली असून, पोलीस निरीक्षक संदीप भागवत तपास करत आहेत.