
> स्पायडरमॅन
हिंदुस्थानात सध्या स्टार्टअप कंपन्यांना सुगीचे दिवस आहेत. अनुभवी लोकांच्या बरोबर अनेक अननुभवी तरुणदेखील विविध भन्नाट आयडियांसकट ग्राहकांच्या भेटीला येत आहेत. मानवी जीवन अधिक सोपे, अधिक रंगतदार करणारी अनेक अॅप्स, प्रोग्राम्स, गॅझेट्स हे स्टार्टअपवाले आपल्यासाठी घेऊन येत असतात. सध्या हिंदुस्थानमध्ये खवय्यांची प्रचंड संख्या आहे आणि बिर्याणी हा नंबर एकचा खाल्ला जाणारा खाद्यपदार्थ आहे. हाच धागा पकडून एका स्टार्टअपने सध्या चक्क बिर्याणीचे ATM मशीन सुरू केले आहे.
चेन्नईमध्ये असलेल्या ‘बीव्हीके बिर्यानीज’ने हे अनोखे व्हेंडिंग मशीन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. हिंदुस्थानातील हा पहिलाच प्रयत्न असून ही सर्व प्रक्रिया मानवरहित असणार आहे. या स्वयंचलित ATM मधून ग्राहक अवघ्या काही मिनिटांत आपली आवडती बिर्याणी घरी घेऊन जाऊ शकणार आहेत. या बिर्याणी ATM मशीनच्या स्क्रीनवर ग्राहकांना मेन्यूकार्ड उपलब्ध असेल. टच स्क्रीनच्या मदतीने ग्राहकाने आपली ऑर्डर नोंदवायची आहे. ग्राहकाने आपला नंबर आणि नाव टाकून क्यूआर कोड किंवा कार्डच्या मदतीने पेमेंट केले की, काही मिनिटांतच मशीनच्या तळाशी असलेल्या शेल्फमध्ये त्याची ऑर्डर पॅक होऊन हजर होईल. बीव्हीके बिर्याणीने 2020 साली आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. 60 मिनिटांत घरपोच बिर्याणी पोहोचवणे ही त्यांची खासीयत आहे. सध्या बिर्याणीला सुगीचे दिवस आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. 2022 मध्ये हिंदुस्थानात बिर्याणीची व्रेझ आणि मागणी आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर नोंदवली गेली होती. फूड डिलिव्हरी अॅप्सवर ही टॉप चॉइस आहे. स्विगीने खुलासा केला होता की, 2020 मध्ये त्यांच्या अॅपला दर मिनिटाला 137 बिर्याणी ऑर्डर मिळाल्या, तर झोमॅटोने दावा केला आहे की, त्यांच्या झोमॅटो अॅपला प्रति मिनिट 186 बिर्याणी ऑर्डर मिळाल्या आहेत.

























































