सीना कालव्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीना कालव्याचे आवर्तन सुरू असताना मिरजगावजवळ कालवा फुटला. अधिकाऱयांनी तत्काळ दुरुस्ती करून आवर्तन सुरू करण्याची आवश्यकता असतानाही दुर्लक्ष केले. यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. शिवाय आवर्तनदेखील बंद झाले होते. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन या कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

42 वर्षांपूर्वी बांधलेला सीना कालवा बांधल्यापासून एकदाही दुरुस्त करण्यात आला नाही. परंतु गेल्या दोन वर्षांत हे काम हाती घेण्यात आले असून, आतापर्यंत 10 किलोमीटर कालव्याची साफसफाई, गाळ काढणे ही कामे झाली असून, 65 नवीन गेटही बसविण्यात आले आहेत. तसेच, नव्याने 5 कोटी रुपयेही त्यासाठी मंजूर झाले आहेत. यामध्ये अस्तरीकरण, कालव्याची दुरुस्ती, साफसफाई, सायपन दुरुस्ती, पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. हेही काम तातडीने हाती घेण्यात येणार होते; परंतु त्याला उशीर लागणार असल्याने उन्हाळी आवर्तन सोडण्यास उशीर झाला असता, त्यामुळे दोन्ही उन्हाळी आवर्तने संपल्यानंतर ही कामे हाती घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, गेल्या आठवडय़ात मिरजगाव येथे हा कालवा फुटल्याने उन्हाळी आवर्तन बंद करावे लागले. त्यामुळे शेतकऱयांशी चर्चा करून हे नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कालव्याच्या दोन्ही बाजूने माती आणि मुरुमाचा भराव आणि मध्ये लोखंडी पाईप टाकून पाणी पुढे नेण्याचे काम कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या यांत्रिकी विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. सध्या भराव टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. लोखंडी पाईप उपलब्ध होताच पुढील चार दिवसांत हे काम पूर्ण करून आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. दोन्ही आवर्तने झाल्यानंतरच कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.