
>>डॉ. मुकुंद कुळे
चैत्र मासातली रंगांची नोकझोक वेगळी खरीच! परंतु चैत्राला फाल्गुन आणि वैशाखाची साथ नसेल तर चैत्राचा रंगांचा नखरा थोडा उतरेल हेही खरंच. कारण नवलनयनोत्सव वसंत ऋतू वेढून आहे, तो फाल्गुन–चैत्र–वैशाख या तीन महिन्यांना मिळूनच.
शिशिर ऋतूतील पानगळ सरते आणि वसंताची चाहूल लागून सृष्टी कात टाकायला सुरुवात करते. जणू तिची जीर्ण, शीर्ण काया गळून पडते आणि नवी तकाकी, लकाकी ल्यायलेली नवी काया उभरून येते. कधी नुकतीच कात टाकलेला सर्प पाहिलात? एकीकडे त्याची सुरकुतलेली त्वचा गळून पडते आणि त्याच वेळी नव्या कांतीचा, नव्या त्वचेचा सर्प सळसळत डौलात रानात निघून जातो. त्या तुकतुकीत, तेजस्वी देहाचा विसर पडणं निव्वळ अशक्य! मरणातून सर्जन घडावं तसंच हे. चैत्रात तरी वेगळं काय घडतं? निसर्ग आपला सारा जुना थाट अलगद उतरून ठेवतो आणि बघता बघता अनंत कळांनी सजतो. चैत्राच्या या रंगाढंगाचं वर्णन करायला शब्दही अपुरेच पडतात. पुरे तरी कसे पडणार! निसर्ग का शब्दांत पकडायची गोष्ट आहे? निसर्ग ही अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यात चैत्र मास असेल तर निसर्ग म्हणजे केवळ अनुभवणं नव्हे, तर उपभोगणंही त्यात समाविष्ट होतं आणि मग चैत्र मास केवळ अंगात भिनत जातो.
…अन् जेव्हा केव्हा चैत्राचं शब्दांत वर्णन करण्याची नौबत येतेच तेव्हा का कुणास ठाऊक, हमखास दिवंगत ठुमरी गायिका शोभा गुर्टू यांची आठवण होते. कुठल्या तरी चैत्र मासातच त्यांची एक रंगरसिली मैफल अनुभवली होती. बाईंनी त्या मैफलीत चैती-होरी-कजरीचा खजिनाच रीता केला होता. सारी मैफलच रंगरंगिली झाली होती. सर्वत्र केवळ चैत्रातला वसंत भरून-बहरून राहिला होता. त्यातही चैत्रातला निसर्गाचा कोवळा रंग. कारण बाई म्हणत होत्या,
‘चैतर चुनरी रंगा दे… पियरवा
चुनरी रंगा दे, पिया को बुला दे… पियरवा
चैतर चुनरी रंगा दे…
धानी रंग सारीया मंगा दे… पियरवा
चैतर चुनरी रंगा दे…’
खरं तर या चैतीच्या आधी बाईंनी ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे
मोहे मारे नजरिया सावरिया रे…’ म्हणत साऱयांना गुलाबी रंगात न्हाऊन काढलं होतं, पण हा गुलाबी रंग पुसून काढून त्यांनी पुढच्या चैतीत मैफलीला धानी म्हणजे पोपटी, हिरवा रंग कधी चढवला ते कुणाला कळलंच नाही… आणि खरंच चैत्र मासातल्या पालवीचा रंग न्याराच असतो. तुकतुकीत कांतीचा, कोवळाशार! त्या मैफलीत शोभा गुर्टूंनी चैत्र, वसंताचे सारे रंगच उधळून दिले… आणि तेव्हापासून चैत्र मास म्हटला की, शोभा गुर्टू आठवतात. निव्वळ रंग, रंग, रंग…
चैत्राची हीच तर खासीयत आहे. मोठा मनभावन मास आहे हा. त्याचा राग-पंटाळा कधी येतच नाही. वास्तविक चैत्र सुरू झाला की, उन्हाचा तडका जाणवू लागतो, पण सूर्यालाही रसपान करायला लावणारा हा महिना. मग तो आपल्याला तरी नाराज कसा करेल? उलट सूर्याचा ताप आपल्याला सहन करता यावा म्हणून तो निसर्गात आल्हाददायक बदल घडवतो. रस, रंग, रूप, गंध आणि चव अशा पंचसंवेदनांची अनुभूती देणाऱया आपल्या सगळय़ाच आस्वाद इंद्रियांना तो साद घालतो. मग फुलझाडं फुलतात, फळझाडं बहरतात आणि सृष्टीचा एकच उत्सव सुरू होतो, ‘चैत्रोत्सव!’
असा हा ‘चैत्रोत्सव’ म्हणजे लोकसंस्कृतीचा अपार जिव्हाळय़ाचा विषय. तसे तर सारेच महिने लोकसंस्कृतीला प्यारे, पण तरीही चैत्र मास लोकसंस्कृतीसाठी खासच! कारण हा नवनिर्माणाचा, नवसर्जनाचा महिना. म्हणून तर अजूनही गावाकडे कधीतरी म्हटलं जातंच की,
‘सयांनो आला चैतर मास,
चला चला गं जाऊ आंबेवनास
फुलांची बांधुनी शेल्याला गाठ,
रायाची आज स्वारी येईल खास’
चैत्राला शृंगाराची नाजूक किनार आहे. हा शृंगार धसमुसळा नाही, अलवार आहे. त्यात एक प्रकारचं मार्दव आहे. लाडीगोडी आहे, नटखटपणा आहे. एकमेकांना रिझवण्याची आस आहे. म्हणून तर ‘नेसले पीतांबर जरी, जरी गं जरतारी लाल साडी’ या प्रसिद्ध लावणीतील नायिका आपल्या रायाला म्हणते,
‘आला चैत्र मास उन्हाळा
हवा खाऊ चला आंबेवना
लाडे लाडे बोले मैना
चोळीवर खडी शोभे ऐना…
कुणा सावकाराची मैना’
एकमेकांना नादी लावायचा आणि एकमेकांचा विरह सहन करण्याचाच हा महिना खरा! चैत्रातला वसंत ऐन भरात असतो. निसर्गाच्या चित्तवृत्ती फुललेल्या असतात. सर्जनाच्या साऱया खाणाखुणा हा चैत्र मास दाखवत असतो. अशा वेळी प्रियकराची सोबत असेल तर हा चैत्र मास सहनीय होतो, नव्हे शृंगारमय होतो. मात्र तो सोबत नसेल तर… तर निसर्गाचा हा सारा नजाराच जीवघेणा होऊन जातो. तो अंगाअंगाला टोचतो, किंबहुना छळतो. म्हणून तर एखादी नायिका सहज म्हणून जाते,
‘कसा साहू हा चैत्र उन्हाळा
अंगाला झोंबती अग्निज्वाळा
जवळी नाही श्रीहरी सावळा
सखे गं सांगू दुःख कुणाला’
फाल्गुन-चैत्र-वैशाखाला वेढून असणारा वसंत ऋतू म्हणजे सर्जन प्रेरणेचंच प्रतीक. तसाही वसंत हा कामदेवाचा पुत्र मानला जातो. साहजिकच कामदेवाच्या साऱयाच लीला त्याच्याही ठायी आहेत. त्यातही चैत्रातला वसंत म्हणजे जरा जास्तच उच्छृंखल, तनामनाचे बांध सैल करणारा. त्यामुळेच तर एरवी सर्वत्र सखीला सोबत घेऊन फिरणारी नायिका चैत्रात मात्र म्हणते कशी,
‘चैताच्या मासाला सये, नको येऊ मागं मागं
रानी उभा गं साजण, कशी नेऊ तुला सांग’
एकूण चैत्र मास म्हणजे मानवी भावभावनांना नैसर्गिक साद घालणारा मास. त्याशिवाय का त्याला ‘मधुमास’ असा सुरेख शब्द वापरला जातो? मधू म्हणजे मकरंद, मध. चैत्र मासात, वसंत ऋतूत संपूर्ण निसर्गच फुलून येतो. फुलं फुलतात, तरु-वेली मोहरतात. मग संपूर्ण वातावणात मधाचा एक ओढाळ, वेल्हाळ गंध भरून राहतो. हा गंध एकदा का नाकात शिरला की, तो आपलं शरीरच बधिर करून टाकतो. शरीराला एक प्रकारचं जडत्व येतं, गुंगी येते. ही गुंगी हुरहुर लावणारी असते. मधुमासातील मधाचा असा चढलेला पैफ सहजासहजी उतरत नाही. मग चंद्राचं चांदणं ताप वाढवतं. शरीराला शीतलता मिळावी म्हणून लावलेला चंदनाचा लेपही ताप कमी करण्याऐवजी उलट तो वाढवतो. म्हणून तर एखादी अवखळ नायिका म्हणते,
‘पिठूर चांदणी रात्र राया, फुलांची केली शेज
मधुमास चालला सरूनी, येईना मजला नीज’
या अर्थाने चैत्र काहीसा छंदीफंदीच म्हणायला हवा आणि लोकसाहित्यात, लोकसंस्कृतीत त्याच्या शृंगारिकपणाचे असे अनेक दाखले सापडतात. अर्थात यामुळे चैत्रमासाला कुणी निलाजरा म्हणाल तर खबरदार! निसर्गानेच सर्जनशीलतेचं हे दान पदरात टाकल्यामुळे चैत्र काहीसा उतावीळ वाटतो खरा… आणि केवळ प्रेमभावच त्याला लपेटून आहे असं आपल्याला वाटतं खरं, पण अगदी तसंच काही नाही. चैत्र जेवढा कामुक, तेवढाच सात्त्विकही आहे. म्हणून तर देवांच्या यात्रा, जत्रा सर्वाधिक याच महिन्यात असतात. विशेषतः लोकदेवतांच्या. कारण चैत्र म्हणजे लोरहाटीतला काहीसा विसाव्याचा महिना. शेतीची कामं आटोपलेली असतात, नव्या कामांना सुरुवात करायला थोडा अवकाश असतो. अशाच वेळी गावोगावच्या यात्रा, जत्रांना रंग चढतो आणि मग आयाबाया जत्रेत देवाच्या दर्शनाला बाहेर पडतात.
म्हणजेच चैत्र मास केवळ प्रेमभाव घेऊन येत नाही, तर तो भक्तिभावही घेऊन येतो. तसाही निसर्गाला, सृष्टीला येणारा बहर हा एक प्रकारे तनामनाचं शांतवन करणाराही असतो. निसर्ग सर्व रूपांनी, भावनांनी व्यक्त होत असतो. तुम्ही त्याला आपल्याशी कोणत्या भावनेने जोडून घेता ते महत्त्वाचं. चैत्राचं चैत्रपण केवळ गुढी उभारण्यात नाही तर ते रंगगंधाने न्हाऊन, माखून निघण्यात आहे!



























































