कोरेगावात शेततळ्यात बुडून बालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेततळ्यात बुडून शेतमजुराच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील पळशी स्टेशन येथे घडली आहे. दरम्यान, कोरेगावच्या तत्कालीन तहसीलदार स्मिता पवार यांच्या कारकिर्दीत त्यांचे पती प्रदीप बाबूराव पवार यांचे हे शेततळे आहे.

पृथ्वीराज होनाजी हातागळे (वय 9, मूळ रा. वडवणी, जि. बीड) असे मृत बालकाचे नाव आहे. निखिल गायकवाड (रा. शिंदेवस्ती, बर्गेवाडी, ता. कोरेगाव) यांनी पोलिसांना माहिती दिली.

तत्कालीन तहसीलदार स्मिता पवार यांचे पती प्रदीप यांनी पळशी स्टेशन येथे खरेदी केलेल्या 10 एकर शेतजमिनीत शेततळे बांधले आहे. शेततळ्यातील पाण्याचा वापर प्रदीप पवार यांच्या शेतीसाठी केला जातो. शेतीवर काम करण्यासाठी द्रौपदी हातागळे (वय 32) व त्यांच्या मुली प्रतीक्षा, दीक्षा, साक्षी, प्रीती व मुलगा पृथ्वीराज असे शेतातील खोलीवर राहण्यास आहेत. सोमवारी सकाळी खेळत असताना पुथ्वीराज शेततळ्यात बुडाला. निखिल गायकवाड यांनी कोरेगाव पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पृथ्वीराजचा मृतदेह शेतळ्यातून बाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कोरेगावला पाठवला. याप्रकरणी कोरेगाव पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद झाली असून, पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत. घटनेची माहिती कळताच, सध्या पुणे विभागात कार्यरत असलेल्या तहसीलदार स्मिता पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, प्रिया पवार कोरेगावात तहसीलदार असताना या शेताकडे जाण्यासाठी बेकायदेशीर रस्ता तयार करून गौणखणिज उत्खननप्रकरणी प्रिया पवार व पती प्रदीप पवार यांच्यावर तक्रार दाखल होऊन 4 लाख 12 हजार 500 रुपये दंडही झाला होता. तो दंड न भरल्यामुळे त्यांच्या सातबारा उताऱयावर त्याची नोंद आहे. सध्या स्मिता पवार यांचे पती महाडला शासकीय सेवेत आहेत. ही शेती पती-पत्नी दोघांच्या नावावर असताना पोलिसांच्या पंचनाम्यात स्मिता पवार यांचे नाव नसल्याने याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.