
मंगेश उदगीरकर << [email protected] >>
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
ऑटोवाल्या गणेशच्या अगोदर आमच्या बँकेत काम करणाऱ्या गणेशचा माझा परिचय. हा आमच्या बँकेत टेंपररी स्वीपर म्हणून काम करायचा. त्यावेळी ही पद्धतच होती की, दोनचार वर्षे स्वीपरचे काम केल्यावर त्याला बढती म्हणजे सबस्टाफ म्हणून कायम केले जायचे. ही पद्धत अजूनही चालू असावी. असो, तर गणेश आमच्या बँकेत काम करू लागला. सडसडीत अंगकाठी, अंगात साधे कपडे. तरतरीत, प्रसन्न आणि मुख्य म्हणजे हसतमुख चेहरा. कष्ट करण्यात कुठलीही कुचराई नाही. कुठलीही तक्रार न करता मनोभावे समोर येईल ते काम निष्ठेने करणारा. त्या काळात मी थोडा संघटनेमध्ये सक्रिय होतो आणि याचं भलं व्हावं असं मला मनापासून वाटायचं. मी तसे खुंटे हलवून बळकट करून ठेवले होते, पण स्वीपर ते सबस्टाफ ही प्रोसेस बरीच दीर्घ असते. त्याचेही काम झाले असते, पण घरच्यांमुळे म्हणा किंवा त्यानेच धीर सोडला म्हणून म्हणा त्याने बँकेत येणं बंद केलं. मला थोडं आश्चर्य वाटलं म्हणून मी त्याच्या घरी गेलो. त्याच्या आईवडिलांना भेटलो.
‘‘एवढं काम करून घेतात आणि पगार किती थोडा!’’ असं त्यांचं म्हणणं.
त्यांचं म्हणणं खरं होतं. मी त्यांना समजावून सांगितलं की, फक्त एखादे वर्ष कळ काढा, पुढे सगळं चांगलं होणार आहे याची खात्री मी देतो, पण उपयोग झाला नाही आणि माझ्या आयुष्यात ‘ऑटोवाले गणेशराव’ प्रवेश करते झाले. माझ्याकडे दोन गाडय़ा असूनही मी कुठे बाहेर जायचं झालं की, गणेशला बोलवायला लागलो. लाघवी आणि कष्टाळू स्वभावाचा गणेश हा आता आमच्या कुटुंबाचा भाग होऊन गेला होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण मध्येच गणेशराव अदृश्य झाले. मी अस्वस्थ होऊन गेलो. कारणही कळेना. संथ पाण्यात दगड पडल्यागत झालं. असेल काही घरगुती कारण म्हणून गप्प बसलो. एका संध्याकाळी सहज चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलो तर कोपऱ्यावर गणेश तोंडावरचा घाम पुसत उभा. त्याची ऑटोही होतीच.
‘‘अरे काय गणेश, कुठं आहेस तू ? भेट नाही, गाठ नाही!’’ तो कसनुसं हसला. चेहरा दमलेला आणि काळवंडलेला दिसला.
‘‘काय झालं? काही अडचण आहे का?’’
‘‘नाही मालक! जरा व्यापार सुरू केलाय!’’
‘‘कसला?’’
‘‘लहान मुलांचे रेडिमेड कपडे खेडय़ापाडय़ांत जाऊन विकायचे. माझे वडील हाच धंदा करायचे. त्यांनी सांगितलं म्हणून…’’
‘‘परवडतं का?’’
‘‘परवडतंय, पण धावपळ लई असतीय! रोज वीस-पंचेवीस किलोमीटर जावं लागतंय. ऊन न्हाई, पाऊस न्हाई, जावंच लागतं’’
मी गप्प राहिलो. यात मला बोलण्यासारखं काही नव्हतंच. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी सकाळी गणेश घरी आला. चेहऱ्यावर तेच प्रसन्न हसू.
‘‘काय गणेश, आज खुश दिसतो आहेस!’’
‘‘हो मालक, तो धंदा बंद केला!’’
‘‘का?’’
‘‘काही दिवसांपूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला. दुसऱ्या रिक्षाची धडक बसली. आईवडील घाबरले आणि त्यांनी हा धंदा बंद करायला सांगितला!’’
‘‘बरं झालं बाबा, मीही तेच सांगणार होतो, पण तुला काय वाटेल की, म्हणून बोललो नाही’’
‘‘आता कधी बी बोलवा, मी हजर!’’
ही गोष्ट दहा वर्षांपूर्वीची. नंतरच्या काळात मी परभणी सोडली. पुण्यात स्थायिक झालो, पण अधूनमधून काही कामानिमित्त परभणीला गेलो की, माझ्या रेल्वेच्या डब्यापाशी गणेश हजर असतो. माझी बॅग घेऊन मला हॉटेलमध्ये नेऊन सोडण्यापासून माझ्या परतीच्या वेळेपर्यंत अखंड माझ्या सोबत असतो. मी असेपर्यंत त्याचे रोजचे व्यवहार बंद असतात. जिवलग मित्रांप्रमाणे आम्ही सर्ववेळ गप्पाटप्पा, अगदी जेवणेखाणेसुद्धा एकत्रच करतो. तो मला ‘मालक’ म्हणून आदर देत असला तरी एक मोकळेपणा आमच्यात असतोच. मी त्याची अधूनमधून चेष्टा करतो, तोही माफक हसून ते साजरं करतो. मी विचार करतो की, हे मैत्रीचे बंध कसे निर्माण झाले असतील ? कुठल्याच पातळीवर कसलेही साम्य नसताना? हे खरच अनाकलनीय आहे. मला वाटतं, याचं मूळ त्याच्या रुजू, नम्र स्वभावात दडलेलं असावं. खडकाला भेदून झऱ्याचा उगम व्हावा तसं माझ्यातल्या अहंपणाला कुठेतरी पाझर फुटला असला पाहिजे. ते काही असो, माझ्या जवळच्या आप्तांमध्ये गणेश केव्हाच जाऊन बसला आहे हे मात्र खरं !





























































