
एल्गारच्या ‘पॉम्प अँड सर्कमस्टन्स मिलिटरी मार्चेस’ या संगीत रचना संग्रहातली पहिली रचना अजरामर आहे. हीच रचना इंग्लंडमध्ये राज्याभिषेकाच्या प्रसंगी वाजवली जाताना दिसते. हे संगीत आज ‘ग्रॅज्युएशन मार्च’ म्हणूनही ओळखलं जातं.
6 मे 2023 या दिवशी इंग्लंडमध्ये राजा चार्ल्स (तिसरा) यांचा राज्याभिषेक होईल. याप्रसंगी एक खास संगीत रचना वाजवली जाणं अपेक्षित आहे. हीच संगीत रचना यापूर्वी जॉर्ज (पाचवा), जॉर्ज (सहावा) हे इंग्रजांचे राजे आणि राणी एलिझाबेथ (दुसरी) या लोकांच्या राज्याभिषेक प्रसंगीही वापरण्यात आली होती. ही संगीत रचना म्हणजे महान इंग्रज संगीतकार एडवर्ड एल्गार याची ‘पॉम्प अँड सर्कमस्टन्स’ ही रचना.
एल्गारच्या ‘पॉम्प अँड सर्कमस्टन्स मिलिटरी मार्चेस’ या संगीत रचना संग्रहातली पहिली रचना अजरामर आहे. हीच रचना इंग्लंडमध्ये राज्याभिषेकाच्या प्रसंगी वाजवली जाताना दिसते. एल्गारच्या या संगीत रचना संग्रहात एकूण सहा रचना येतात. (जेव्हा एल्गारनं यातल्या पहिल्या दोन रचना बुसी नावाच्या प्रकाशनाला प्रकाशित करण्यासाठी दिल्या, तेव्हा या प्रकाशनानं त्याला एकूण सहा रचना करण्याचं काम दिलं, पण दुर्दैवानं हे काम त्याच्या मृत्यूपर्यंत अपूर्णच राहिलं). 1901 ते 1907 यादरम्यान त्यानं यातल्या पहिल्या चार रचना केल्या होत्या. पाचवी रचना 1930 मध्ये प्रकाशित झाली होती, तर सहावी रचना त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली होती. खरं तर सहाव्या रचनेचा फक्त कच्चा मसुदाच मिळाला होता. त्यावरून इतर संगीतकारांनी सहावी रचना बनवण्याचं काम पूर्ण केलं.
एल्गारनं ‘पॉम्प अँड सर्कमस्टन्स’ हे संग्रहाचं नाव शेक्सपिअरच्या ‘ऑथेल्लो’ नावाच्या नाटकातून घेतलं होतं, पण यातल्या पहिल्या रचनेची प्रेरणा होतं ‘दि मार्च ऑफ ग्लोरी’ नावाचं टॅबले या कवीचं काव्य. या काव्यात युद्धात लढणाऱ्या सैनिकांच्या लष्करी मार्चचं (लष्कराची आगेकूच) वर्णन येतं.
1901 मध्ये लिव्हरपूलमध्ये या संग्रहातल्या पहिल्या दोन रचना लिव्हरपूल ऑर्केस्ट्रानं सादर केल्या. ‘लिव्हरपूल ऑर्केस्ट्रल सोसायटी’मधल्या आल्फ्रेड रोडवाल्ड यानं याप्रसंगी कंडक्टरची भूमिका पार पडली होती. एल्गारनं पहिली रचना रोडवाल्ड आणि लिव्हरपूल ऑर्केस्ट्रल सोसायटीमधल्या इतर मित्रांना समर्पित केली होती. लिव्हरपूलमध्ये ही रचना सादर होताना एल्गार सपत्नीक हजर होता. ही रचना श्रोत्यांनी अक्षरशः उचलून धरली. दोनच दिवसांनी इंग्लंडमधल्या मानाच्या ‘लंडन प्रॉमनेड कन्सर्ट’मध्ये ही रचना सादर करण्यात आली होती. काही कारणानं एल्गार याप्रसंगी हजर नव्हता. लंडनमधल्या श्रोत्यांनीही ही रचना वेडय़ासारखी उचलून धरली. ‘लंडन प्रॉमनेड कन्सर्ट’च्या आजपर्यंतच्या इतिहासात दोनदा ‘वन्स मोअर’ मिळणारी ही एकमेव रचना.
पहिल्या रचनेच्या संगीत रचनेत संथ संगीताचा एक भाग येतो. 1902 मध्ये या संथ संगीतावर आधारित असं ‘लँड ऑफ होप अँड ग्लोरी’ नावाचं एक इंग्रजांचं देशभक्तिपर गीत रचण्यात आलं. याच वर्षी इंग्लंडच्या राजाच्या राज्याभिषेकप्रसंगी हे ‘लँड ऑफ होप अँड ग्लोरी’ वापरण्यात आलं.
लंडनमधल्या ‘प्रॉमनेड कन्सर्ट’नंतर चार वर्षांनी अमेरिकेतल्या येल विद्यापीठानं पदवी प्रदान कार्यक्रमात एल्गारचा सन्मान करण्याचं ठरवलं. या विद्यापीठात एल्गारचा एक जवळचा मित्र संगीताचा प्राध्यापक होता. या कार्यक्रमात येल विद्यापीठानं एल्गारला त्याच्या संगीत क्षेत्रातल्या कार्याच्या सन्मानार्थ डॉक्टरेट पदवी दिली. याप्रसंगी एल्गारच्या काही रचना सादर करण्यात आल्या. यात शेवटी ‘पॉम्प अँड सर्कमस्टन्स’ ही रचना सादर करण्यात आली.
दोनच वर्षांनी अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विद्यापीठानंही ‘पॉम्प अँड सर्कमस्टन्स’मधली हीच रचना पदवी प्रदान समारंभात वापरली. पुढच्या काही वर्षांत अमेरिकेतल्या शिकागो, कोलंबिया आणि इतर काही विद्यापीठांनीही हेच संगीत पदवी प्रदान समारंभात वापरलं. 1920च्या दशकात एल्गारची ही रचना अमेरिकेत पदवी प्रदान कार्यक्रमांमध्ये सर्रास वापरण्यात येऊ लागली. आज कॅनडा, अमेरिका आणि फिलिपाइन्समध्ये एल्गारच्या पहिल्या रचनेतला ‘लँड ऑफ होप अँड ग्लोरी’ हा भाग पदवी प्रदान कार्यक्रमांमध्ये वापरला जातो. त्यामुळं हे संगीत आज ‘ग्रॅज्युएशन मार्च’ म्हणूनही ओळखलं जातं.
इंग्रजांनी राज्याभिषेक प्रसंगी आणि अमेरिकेतल्या लोकांनी पदवी प्रदान प्रसंगी ही रचना का निवडावी हे पाहण्यासाठी आपण एल्गारची ही रचना एकदा तरी यूटय़ूबवर जाऊन ऐकायलाच हवी.





























































