30 मार्चला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहाणार, उद्यापासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

(शिर्डी) साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दिनांक 29 मार्च ते शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 अखेर साजरा करण्‍यात येणाऱ्या श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असून साई भक्तांसाठी मोठी बातमी आहे. 30 मार्च रोजी साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहाणार आहे. उद्यापासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची सुरुवात होत आहे. 30 मार्च रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. त्यामुळे 30 मार्च रोजी नित्‍याची शेजारती तसेच 31 मार्च रोजीची पहाटेची काकड आरती होणार नसल्याचं देखील साईसंस्थान कडून सांगण्यात आलंय. या तीन दिवसीय रामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो पालख्यांसह दरवर्षी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होतात. या कालावधीत विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

श्रीरामनवमी उत्‍सवाची सुरुवात 1911 मध्‍ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्‍यात आली. तेव्‍हापासून प्रतीवर्षी हा उत्‍सव मोठया उत्‍साही वातावरणात शिर्डी येथे साजरा केला जातो. उत्‍सवात होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून दर्शनाची व्‍यवस्‍था सुखकर व्‍हावी, तसेच भाविकांची उन्‍हापासुन संरक्षणाकरीता मंदिर परिसरात, मंगल कार्यालय व साईनगर मैदान आदी ठिकाणी सुमारे 11 हजार चौ.फुट मंडप उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच साईभक्‍तांच्‍या अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेकरीता साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान (500 रुम), साईधर्मशाळा व साईनगर मैदान याठिकाणी सुमारे 39 हजार चौ.फुट बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्‍यात आलेली असून यामध्‍ये विद्युत, पाणी पुरवठा, स्‍वच्‍छतागृह व सुरक्षा व्‍यवस्‍था ठेवण्‍यात आलेली आहे.

मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात येत आहे. तसेच मंदिर परिसर व शिर्डी परिसरात बंदोबस्‍त चोख ठेवण्‍यासाठी संस्‍थान सुरक्षा विभागाचे संरक्षण कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सिघ्र कृतीदल पथक, बॉम्‍ब शोधक पथक तैनात करण्‍यात आले आहे. याबरोबरच श्री साईबाबा संस्‍थान, पोलीस प्रशासन व शिर्डी नगरपंचायत यांचे संयुक्‍त अतिक्रमण व दलाल प्रतिबंधक पथक ही सज्‍ज ठेवण्‍यात आलेले आहेत. उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद, लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी 150 क्विंटल साखरेचे अतिरिक्‍त लाडू तयार करण्‍यात येणार असून श्री साईनाथ मंगल कार्यालय, व्‍दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्‍प्‍लेक्‍स, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत, शिर्डी विमानतळ व सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आलेले आहेत.

उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, संजय जोरी, मुख्‍यलेखाधिकारी मंगला वराडे, उपकार्यकारी अभियंता .बी.डी.दाभाडे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहे.