शिवसेना फोडण्याचा कट फडणवीसांचा; दीडशे बैठका घेतल्या! तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना फोडण्याचा कट देवेंद्र फडणवीसांचा होता, असा गौप्यस्फोट गद्दार तानाजी सावंत यांनी केला आहे. 2019 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर तेव्हा विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीस यांच्या आदेशाने मी पहिली बंडखोरी केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वतः मिळून 150 बैठका घेतल्या, असे खोके सरकारमध्ये सध्या आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंत यांनी सांगितले.

धाराशीवमधील परंडा येथे एका कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी शिवसेना फोडण्यामागच्या कटाची जाहीर कबुली दिली आणि फडणवीसांच्या कारस्थानांचे बिंग फोडले. एकनाथ शिंदे या कारस्थानात कसे सामील होते याचे पितळही सावंत यांनी उघड केले.

‘2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार आले तेव्हापासूनच सरकार पाडण्याचे काम सुरू करण्यात आले होते. 30 डिसेंबर 2019 रोजी महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात मला स्थान मिळाले नाही. त्यामुळे 3 जानेवारी 2020 रोजी मी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पहिले बंड केले. सुजितसिंह ठाकूर आणि मी धाराशीव जिल्हा परिषद आमच्याकडे आणली. बंडाची सुरुवात तिथूनच झाली’, असे सावंत म्हणाले.

आमदारांचे मन वळवले!
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे दीडशे बैठका केल्या. त्याचवेळी शिवसेनेतून फुटण्यासाठी आमदारांचे मन वळवावे म्हणून काऊन्सिलिंगही केले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जाऊन आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या. या सर्व गोष्टी मी फडणवीस आणि शिंदेंना सांगून करत होतो, असेही सावंत यांनी सांगितले.