
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीमधून शेतकऱ्याला सावरता यावे यासाठी आम्ही अधिवेशनात शेतकऱ्यांना एक हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती, मात्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 300 रुपये अनुदान जाहीर केले. आम्ही पुन्हा हे अनुदान वाढवण्याची मागणी सरकारकडे केल्यानंतर साडे तीनशे रुपये अनुदान देण्यात आले. मात्र असं अनुदान देऊन सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकार विरोधात केली आहे. नाशिक येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी अजित पवार म्हणाले की, तुम्ही शेतकऱ्यांना जेवढे अनुदान देत आहात ही शेतकऱ्यांची थट्टा आहे, असे आम्ही सरकारला सांगितले. अधिवेशन 25 तारखेला संपले मात्र बऱ्याच ठिकाणी केंद्र बंद असल्याचे कळत आहे. कांदा खरेदी सुरु व्हायला हवी, कर्मचाऱ्यांच्या संप काळात काही शेतकऱ्यांना मदत पोहचली नाही. आणखी हरभरा केंद्र देखील सुरू करावे. याविषयी मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार असल्याचे पवारांनी सांगितले.


























































