चिपळूणचा जवान अजय ढगळे सिक्कीममध्ये शहीद, भूस्खलनात बर्फाखाली 4 जवान गाडले गेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या सीमेवर झालेल्या भूस्खलनात चिपळूणचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे (36) शहीद झाले आहेत. चिपळूणच्या मोरवणे ढवळेवाडी गावचे सुपुत्र व चिपळूण येथील माजी सैनिकी मुलांच्या वसतिगृहाचे छात्र सुभेदार अजय शांताराम ढगळे सिक्कीममध्ये बर्फवृष्टीनंतर रस्त्याची रेकी करण्यासाठी हिंदुस्थान-चीन सीमेवर गेले होते. त्याच वेळी सततच्या बर्फकृष्टीमुळे 24 मार्च रोजी सिक्कीममध्ये प्रचंड प्रमाणावर भूस्खलन झाले. त्यात सुभेदार ढगळे व त्यांच्यासोबत असलेले चार जवान गाडले गेले.

या दुर्घटनेची माहिती हिंदुस्थानी सेना दलाला मिळाल्यानंतर सेना दलाच्या जवानांनी प्राणांची बाजी लावत चिखल, दगड आणि बर्फाखाली असलेल्या बहादूर शहीद सुभेदार अजय ढगळे व इतर चार जवानांना शोधून काढले. शहीद अजय ढगळे यांचा कारगील लढाईत टायगर हिल जिंकण्यात मोठा वाटा होता. त्यांचे पार्थिक सोमवारी मोरवणे गावी आणण्यात येणार आहे.

अजय ढगळे यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी तवंगला आणण्यात येणार होते. मात्र खराब वातावरणामुळे रविवारी संध्याकाळी त्यांचे पार्थिक गुवाहाटीला आणले जाईल. त्यानंतर सोमवारी गुवाहाटीहून किमानाने पुणे येथे आणि नंतर पुण्याहून रस्तेमार्गे मोरवणे (ढवळे काडी, चिपळूण) येथे आणले जाईल.

सोमवारी अंत्यसंस्कार होणार
शहीद अजय ढगळे यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुली, 2 भाऊ, 4 बहिणी असा परिवार आहे. शहीद अजय ढगळे यांच्या पार्थिवावर सोमवारी शासकीय इतमामात मोरवणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते जवळ असलेल्या मोरवणे येथे त्यांच्या गावी त्यांचे आईवडील राहतात. तर त्यांची पत्नी व मुले मुंबईतील बोरिवली येथे वास्तव्यास आहेत.