संजय राऊत यांना धमकी, पुण्यातून एकाला अटक; लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चंदननगर भागातून एकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपासासाठी आरोपीला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. राहुल तळेकर (23, रा. वडगाव शेरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

पंजाब, हरयाणामध्ये दहशत असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याचा मेसेज खासदार संजय राऊत यांना पाठवण्यात आला होता. ‘दिल्लीत आल्यानंतर एके -47 ने उडवून टाकू’ अशी धमकी यामध्ये देण्यात आली होती. खासदार राऊत यांना धमकी मिळाल्याचे वृत्त पसरताच एकच खळबळ उडाली.

मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी हा पुण्यात असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी पुणे पोलिसांना शुक्रवारी रात्री याची माहिती दिली. या माहितीवरून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला चंदननगर भागातून पकडले. राहुल तळेकर पुण्यातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन शुक्रवारी रात्रीच मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

बिष्णोईविरोधात गुन्हा
दरम्यान, आमदार सुनील राऊत यांनी याप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांत लॉरेन्स बिष्णोईविरोधात तक्रार दिल्यानंतर भादंवि कलम 506(2), 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.