‘देवा भाऊंच्या काळात गुन्हेगारी झाली कमी? की….’, विद्यमान सरपंचाच्या हत्येनंतर राष्ट्रवादीचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिरगाव येथील विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळी यांची शनिवारी रात्री हत्या झाली. अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून त्यांना ठार मारले. यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राष्ट्रवादी काँग्रेसने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गुन्हेगारी कमी झाली की देवाघरी पाठवण्याची हमी दिली जातेय असा खोचक सवाल त्यांनी केला.

“देवा भाऊंच्या काळात गुन्हेगारी झाली कमी? की, देवाघरी पाठवण्याची दिली जातेय हमी? हाच का तुमचा धाक? #देवा_भाऊ_सुपरफास्ट” असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

सोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यात राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील गुन्हेगारी दर कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या सोबतच रोहित पवारांनी राष्ट्रवादी सरपंचाच्या निर्घृण हत्येची व्हिडीओ क्लिप देखील जोडली आहे. ज्यामध्ये तीन दुचाकीस्वार त्यांच्यावर वार करताना दिसत आहेत.