सदानंद कदम यांना याचिकेत दुरुस्तीला मुभा, दापोली साई रिसॉर्ट प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांना गेल्या वर्षीच्या रिट याचिकेत दुरुस्ती करण्यास आज उच्च न्यायालयाने मुभा दिली. कदम यांना दापोली, खेडच्या तहसीलदारांनी पर्यावरणाच्या कथित नुकसानीपोटी अडीच कोटींच्या भरपाईसाठी नोटिसा बजावल्या आहेत, याकडे वकील व्यंकटेश धोंड यांनी लक्ष वेधत याचिकेत दुरुस्ती करण्यास परवानगी मागितली होती.

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले सदानंद कदम यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयासह राज्य यंत्रणांच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्यावर आज न्यायमूर्ती आर. डी. धनुका, गौरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी वकील धोंड यांनी तहसीलदारांकडून कदम यांना बजावलेल्या नोटिसांकडे लक्ष वेधले. त्याअनुषंगाने याचिकेत दुरुस्ती करण्यास खंडपीठाने मुभा दिली. याचवेळी प्रशासकीय यंत्रणांकडून साई रिसॉर्टवर कारवाई केली जाण्याची भीती व्यक्त केली. त्यावर प्रशासनाकडून कारवाईबाबत पावले उचलली गेल्यास न्यायालयात दाद मागू शकता, अशीही मुभा खंडपीठाने कदम यांच्या वकिलांना दिली. याचिकेकर जूनमध्ये पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेले सदानंद कदम यांनी ईडीच्या गुन्ह्यात जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी 10 एप्रिलला सुनावणी निश्चित केली.