फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही! उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक अत्यंत फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार आणि लाळघोटे करणारा उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतो आहे. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदाराने हल्ला केला तरी सुद्धा कुठेही काही हलायला तयार नाही. यांची गुंडगिरी वाढत चालली आहे. पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत, महिलांना मारहाण केली जात आहे. फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहायचा अधिकार नाही, अशा अत्यंत कडक शब्दात (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ठाण्यात रोशनी शिंदे नावाच्या महिलेला मारहाण झाल्याच्या प्रकरणानंतर साधी तक्रारही नोंदवण्यात आलेली नसल्यानं संतापलेल्या उद्धव ठाकरे यांनी साऱ्या व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित करत घणाघाती टीका केली.

जखमी महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कार्यकर्ते, पत्रकार आणि सामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरुद्धचा संताप उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या नजरेतून आणि शब्दातून व्यक्त होताना दिसला. राज्यातील आणि विशेषत: ठाण्यातील वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्याचा कोणताही प्रयत्न गृहमंत्र्यांकडून होत नसल्याचं दिसत असल्याचं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत कडक शब्दात लक्ष्य केलं.

‘गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुंसक अशा शब्द वापरल्याचं मी ऐकलं. त्याची प्रचिती आपल्याला काल आली आहे. सरकारचं नपुंसक म्हटल्यावर कोणाकडून काय अपेक्षा करायची हा मोठा प्रश्न आहे. सुक्षिक्षित सुसंस्कृत ठाणे ही ओळख पुसून गुंडांचे ठाणे अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. महिलांची गँग बनायला लागली आहे, महिला गुंड बनायला लागल्या तर देशाचं, राज्याचे. ठाण्याचे काय होणार हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी काहीही करावं आणि आम्ही ऐकून घ्यायचं. आता म्हटलं तर या क्षणाला आम्ही यांची गुंडगिरी मुळासकट ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उखडून फेकून देऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटल्यावर महिला गुंडाकरवी हल्ला करवणारे हे नपुंसकच म्हणायला हवेत. दुर्दैवाने आपल्याला भेटण्यापूर्वी आयुक्तालयात गेलो तेव्हा आयुक्तच नव्हते. रोशनीने हल्ला करणाऱ्यांची नावेही दिली आहे. घटना व्हिडीओत रेकॉर्ड झाली आहे. रोशनी मातृत्वासाठी उपचार घेत होती. की हात जोडून त्यांना सांगत होती की पोटात मारू नका, लांबून बोला तरीही तिला पोटात लाथा मारण्यात आल्या. अशी निर्घृण काम करणारे माणसे ठाण्यात काय महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीची नाहीत’, असंही त्यांनी या पत्रकार परिषदेवेळी सुनावलं.

‘सर्वोच्च न्यायालय सरकारला जे म्हणाले त्याचा एक घटक म्हणून आयुक्त वागतायत की काय याची मला कल्पना नाही. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर या मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला तरीही कुठे हलायला तयार नाही. यांची गुंडगिरी वाढत चालली आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘रोशनी यांनी म्हटलंय की मी कोणतीही कॉमेंट केली नव्हती. रोशनी यांचा माफी मागितल्याचा व्हिडीओ करून घेतला तरीही आणकी महिला बोलावून मारहाण झाली. फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही आलं तर एसआयटी नेमली जाते, बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. मिंधे गटाकडून त्यांच्या पक्षाच्या लोकांवर हल्ले झाले तर तिथे ही फडणविशी दाखवण्याची हिम्मत नाही. यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री हे लोकं ठरवतील. मंत्र्यांकडे एक खातं असतं. एक खातं तयार करून त्यांनी गुंडमंत्री एक खातं निर्माण करून गुंड पोसण्याचे काम त्या मंत्र्याकडे द्यावे. शिवसैनिक शांत राहीले म्हणजे, शिवसैनिक तुमच्यासारखे जे सर्वोच्च न्यायालय म्हणते तसे नपुंसक नाही. मनात आणले तर या क्षणाला ठाण्यातून मुळातून उखडून टाकण्याची जिद्द असणारे शिवसैनिक ठाण्यात आहेत. गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा. आयुक्तांनाही सांगायचंय की तुम्ही पदभार स्वीकारताना घेतलेल्या शपथेची ही प्रतारणा आहे. बिनकामाच्या आयुक्ताला निलंबित करा किंवा बदली करा आणि एक कणखऱ आयुक्त ठाण्याला दिला पाहिजे. गृहमंत्री हे लाळघोटे करणारे नसतील. लोकांनी म्हटलं की आम्ही तुमच्या कारभारावर थुंकतो तर इतकं साचेल की मग तुम्हाला लाळेने भरलेला चेहरा घेऊन लोकांसमोर जायला लाज वाटेल. लाज, लज्जा, शरम असेल अंगात हिंमत असेल तर आयुक्तांची बदली करा किंवा निलंबित करा. इतकं सगळं होऊन, व्हिडीओ देऊनही साधा एफआयएर घ्यायला पोलीस तयार नाही, असे हे लाचार पोलीस जनतेचे रक्षणकर्ते होऊ शकत नाही. उगाच यात्रा काढायच्या मात्र ज्यांच्या नावाने त्या काढत आहात, त्याचे विचार तुमच्या रक्तात नसतील तर फुकाच्या यात्रा काढू नका. नाहीतर आमचे सरकार आल्यानंतर या सगळ्यांना जेलयात्रा करावीच लागेल’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘आयुक्तांना झेपत नसेल, प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर त्यांनी पदावरून दूर व्हावं नाहीतर कडक कारवाई करावी’, अशी ठाम भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

‘तुमच्या डोळ्यादेखत चाललं आहे, तुम्ही नुसती प्रतिक्रिया घेण्यापुरता मर्यादीत राहू नका, तुम्हाला हे पटत असेल तर तुम्हाला हे राज्य लखलाभो, आम्हाला हे पटणारे नाही. फडणवीसांना झेपत नसेल, वरून आदेश आला असेल तर महाराष्ट्राच्या जनतेशी प्रामाणिक राहून पदभार सोडून द्यावा जेणेकरून त्यांच्यावर जे येत आहे त्याची वेळ येणार नाही. रोशनी यांनी दिलेली जी नावे आहेत त्यांची नाव आणि फोटो यांचे फोटो गल्लीबोळात लावा आणि सांगा हे आरोपी आहेत ज्यांनी हल्ला केला आहे’, अशा शब्दात त्यांनी सुनावलं.