
लांब पल्ल्याच्या प्रवासी ट्रेनमधून हजारो यात्री दररोज प्रवास करतात. त्यातील पहिल्या वर्गाच्या एसी डब्यात चादरी, टॉवेल्स, उश्या पुरवण्यात येतात. पण, त्यांच्या स्वच्छतेविषयी नेहमीच मनात शंका येते. आता, यावरही रेल्वेने एक मार्ग शोधला आहे.
चादरींच्या स्वच्छतेविषयी माहिती देण्यासाठी क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा क्युआर कोड स्कॅन करून प्रवाश्याला मिळालेली चादर किंवा तत्सम कपडा हा कधी स्वच्छ करण्यात आला होता, त्याची माहिती मिळू शकेल. गया रेल्वेस्टेशनपासून आणि या स्टेशनवरून जाणाऱ्या ट्रेन्समध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.
अनेक प्रवाश्यांच्या चादरीच्या स्वच्छतेविषयी तक्रारी होत्या. त्यावर हा उपाय काढण्यात आला आहे. एकदा बेडरोल स्वच्छ झाला की तो क्युआर कोड असलेल्या पिशवीत टाकण्यात येईल. त्या क्युआर कोडवर स्वच्छ झाल्याची माहिती दिलेली असेल. जर हा बेडरोल अस्वच्छ आढळला तर त्याला परत करता येईल. क्युआर कोड स्कॅन करून स्वच्छ बेडरोल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोच अटेंडन्टवर असेल, अशी माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.


























































