फडणवीस फडतूस गृहमंत्री… झेपत नसेल तर राजीनामा द्या! शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नपुंसक म्हटले आणि त्याची प्रचिती ठाण्यात आली. मातृत्वासाठी उपचार घेणाऱ्या रोशनी शिंदे या युवतीसेनेच्या कार्यकर्तीवर ठाण्यात मिंधेंनी महिला गुंडांच्या गँगमार्फत हल्ला केला. तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत की गुंडमंत्री, असा खडा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्राला अतिशय फडतूस, लाचार, लाळघोटेपणा करणारा आणि नुसती फडणविशी करणारा माणूस गृहमंत्री म्हणून मिळाला आहे. त्यामुळे हल्लेखोरांचे पुरावे देऊनही गुन्हा दाखल केला जात नाही. फडणवीस यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा. सरकारच नपुंसक आहे म्हटल्यावर कोणाकडून काय अपेक्षा ठेवायची, असे जबरदस्त तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले.

शिवसैनिक शांत आहेत, पण नपुंसक नाहीत हे लक्षात ठेवा. त्यांनी मनात आणलं तर या क्षणाला ठाणेच काय अवघ्या महाराष्ट्रातून त्यांची गुंडगिरी उखडून फेकण्याची जिद्द आणि हिंमत आहे!

रोशनी शिंदेवर हल्ला करणाऱ्या मिंध्यांची आणि तिची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल न करणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनमानी कारभाराची उद्धव ठाकरे यांनी लक्तरे काढली. जिवाला जीव लावणारे, महिलांचे रक्षण करणारे धर्मवीर आनंद दिघेंचे सुसंस्कृत ठाणे, अशी ठाण्याची ओळख होती. पण ती पुसून गुंडांचे ठाणे अशी ओळख बनवण्याचा प्रयत्न मिंध्यांनी सुरू केला आहे. ठाण्यात गुंड महिलांची गँग तयार केली जाते का? महिला कार्यकर्त्यांवर महिलांकडूनच अशी अमानुष मारहाण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही झाली नव्हती. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडमंत्री, असा प्रश्न पडला आहे. शिंदे आता गुंडांना पोसणारे मंत्री झाले आहेत. प्रत्येक मंत्र्याकडे खातं असतं. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना गुंडमंत्री हे एक खातं निर्माण करावं आणि गुंड पोसण्याचे काम या खात्याकडे द्यावं, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

जेल यात्रा करावी लागेल
हे गुंड सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढत आहेत. ज्यांच्या नावाने यात्रा काढता त्यांचे विचार रक्तात नसतील तर फुकाच्या यात्रा काढू नका. आमचे सरकार आले तर या सगळय़ांना जेल यात्राही करावी लागेल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. ‘सगळे पुरावे देऊन तक्रार दिली तरी साधा एफआयआर दाखल होत नाही… हे असले लाचार पोलीस रक्षणकर्ते होऊ शकत नाहीत’, अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली.

राज्यपालांकडे जाणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राज्यपाल वगैरे ही खूप मोठी व्यक्ती आहे. गल्लीतल्या महिलांना त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून मारहाण व्हायला लागली तर कायदा- सुव्यवस्थेचे करायचे काय? आणि त्यावर राज्यपाल तरी काय करणार?’

यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, आमदार सुनील राऊत, रमेश कोरगावकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, माजी नगरसेवक एम. के. मडवी, उपशहरप्रमुख विजयानंद माने, ठाणे जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, प्रवक्ते अनिश गाढवे, चंद्रभान आझाद यांच्यासह असंख्य शिवसैनिक, महिला आघाडी कार्यकर्त्या, युवासैनिक उपस्थित होते.

तुमच्या कुटुंबातील असती तर…
‘रोशनी गर्भवती नव्हती असे एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचे पत्रकारांनी सांगताच म्हणून मारहाणीचे तुम्ही समर्थन करणार काय? आणि त्याची तक्रार ही घ्यायची नाही काय? हा कोणता कायदा आणी हे कोणते राज्य, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मातृत्वासाठी ती ट्रीटमेंट घेत होती तरीसुद्धा तिच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. तिची प्रेग्नेंसी निगेटिव्ह असेल तर पोटात लाथा मारायच्या का? तुमच्या कुटुंबात कोणाची प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव्ह असेल आणि त्यांना अशी मारहाण झाली तर तुम्ही सहन करणार का, असा प्रतिप्रश्नच उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना केला.’

मातृत्वासाठी उपचार आणि गर्भवती; पाप लपवण्यासाठी मिंध्यांचे धंदे

रोशनी शिंदे ही गेल्या सहा महिन्यांपासून मातृत्व लाभावे यासाठी उपचार घेत होती. या उपचारातही संबंधित महिलेची प्रचंड काळजी घ्यावी लागते. रोशनी गर्भवती आहे असे कुणीही म्हटलेले नाही. तरी स्वतःचे पाप लपवण्यासाठी मिंधे गट रोशनी ही गर्भवती नसल्याचे सिव्हिल रुग्णालयाचे रिपोर्ट समाजमाध्यमांवर फिरवत टिमकी वाजवत होता. या मिंध्यांना गर्भवती आणि मातृत्वासाठी उपचार घेणारी महिला यातील फरक कळत नाही का, इतकेही सामान्य ज्ञान त्यांच्याकडे नाही काय, आणि मातृत्वासाठी उपचार घेणारी रोशनी गर्भवती नाही म्हणून तिला केलेली मारहाण ही समर्थनीय आहे काय, असा सवाल ठाणेकर विचारत आहेत.

सरकारचा प्रचंड दबाव; रोशनीवरच केला गुन्हा दाखल

रोशनीला बेदम मारहाण केल्यानंतर पुरावे देऊनही मिंधे गटाच्या महिलांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले तेव्हा आयुक्त जागेवर नव्हते. पण त्यानंतर मिंधे गटाच्या महिलांनी पोलीस आयुक्तालयात जात रोशनी शिंदेवर फेसबुक पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि सोमवार संध्याकाळपासून झोपी गेलेली पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. सरकारच्या प्रचंड दबावामुळे त्यांनी रोशनी शिंदेवर तत्काळ गुन्हा दाखल केला.

भिऊ नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी आज संपदा रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे हिची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. उद्धव ठाकरे यांना पाहताच रोशनीला अश्रू अनावर झाले. काहीही झाले तरी मी शिवसैनिक आहे. हटणार नाही, असे रोशनी म्हणाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भिऊ नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. याचं उत्तर त्यांना नक्की देऊ, असे ते म्हणाले. तू प्रकृतीची काळजी घे, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी डॉ. उमेश आलेगावकर यांच्याकडून रोशनीच्या उपचाराबाबत माहिती घेतली.

यांची गुंडगिरी ठाण्यातूनच काय, महाराष्ट्रातून उखडून फेकू

गुंड आणि तोतये शिवसैनिक बाळासाहेबांच्या नावाने शिवसेनेचा झेंडा नाचवत आहेत. पण महिलांवर हल्ले करणारे हे नपुंसक आहेत. त्यांच्यावर कारवाई न करणारे राज्य सरकारही नपुंसक आहे. शिवसैनिक शांत आहेत, पण नपुंसक नाहीत हे लक्षात ठेवा. त्यांनी मनात आणलं तर या क्षणाला ठाणेच काय अवघ्या महाराष्ट्रातून त्यांची गुंडगिरी उखडून फेकण्याची जिद्द आणि हिंमत आहे, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांना दिला.

ठाण्यातील जखमी रणरागिणी रोशनी शिंदे यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

रोशनी शिंदे या युवतीसेनेच्या कार्यकर्तीला सोमवारी रात्री तिच्या कार्यालयात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. रोशनीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांनी आज रुग्णालयात जाऊन रोशनीची भेट घेतली आणि तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

फडणवीस लाचार, लाळघोटे

महाराष्ट्राला अतिशय फडतूस गृहमंत्री लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा… उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणविशी करणारा माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. मातृत्वासाठी उपचार घेणाऱ्या रोशनी शिंदे या तरुणीला पोटात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण होऊनही गुन्हा दाखल केला जात नाही. त्यामुळे या फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही आलं की लगेच एसआयटी नेमली जाते, पण त्यांच्याच पक्षातील लोकांवर मिंधे गटाच्या आमदाराने हल्ला केला तर तिकडे फडणविशी दाखवण्याची त्यांची हिंमत नाही, असा फडणवीसांच्या बोटचेप्या कारभाराचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.

शिंदे आता गुंडांना पोसणारे मंत्री झाले आहेत. प्रत्येक मंत्र्याकडे खातं असतं. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना गुंडमंत्री हे एक खातं निर्माण करावं आणि गुंड पोसण्याचे काम या खात्याकडे द्यावं!

बिनकामाच्या पोलीस आयुक्तांना निलंबित करा!

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, या सगळय़ा प्रकाराची माहिती घेण्यासाठी मी पोलीस आयुक्तालयात गेलो. तर तिथे पोलीस आयुक्तच उपस्थित नाहीत. असले बिनकामाचे आयुक्त काय कामाचे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात हे असे शोभते का, पोलीस दबावाखाली आहेत का, फडणवीस हे खरोखर गृहमंत्री असतील, लाळघोटेपणा करत नसतील आणि त्यांना थोडी जरी लाजलज्जा, शरम असेल तर त्यांनी ताबडतोब अशा बिनकामाच्या आयुक्ताला निलंबित करावे, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले.