
>> दिलीप प्रभाकर गडकरी
डॉ. शंकर आबाजी भिसे यांनी संशोधन केले, नवीन शोध लावले, यंत्रे तयार केली, कारखाने सुरू केले. त्यांच्या कार्याची दखल परदेशात मोठय़ा प्रमाणात घेण्यात येऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्या मानाने हिंदुस्थानात त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. भिसे यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल झाले. त्यांच्या कार्याबद्दलची माहिती पुढील पिढीला व्हावी यासाठी त्यांच्या उज्ज्वल वाटचालीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजच्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त…
हिंदुस्थानचे जुन्या पिढीतील शास्त्रज्ञ आणि संशोधक डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे घराणे मूळचे मंडणगडचे असले तरी भीमनाथ गोविंद भिसे रायगड जिह्यातील जंजिरा-मुरुड येथे वास्तव्यास होते. आबाजी बळवंतराव भिसे यांचा जन्म 1818 साली मुरुड येथे झाला. ते शिक्षणासाठी व नोकरीसाठी मुंबईत आले. योगायोगाने 1867च्या सुमारास यंत्रयुगाला सुरुवात झाली होती. भिसे हे उपजत शास्त्रज्ञ होते. बालपणीच त्यांचे यंत्रकलेकडे लक्ष होते. शालेय शिक्षण नसूनही त्यांनी लहानपणी केलेले यांत्रिक प्रयोग त्यांच्या कुशाग्रतेचे दर्शक ठरतात. मॅट्रिकची परीक्षा पास होऊन नोकरी मिळेपर्यंतच्या काळात भिसे यांनी ऑईल पेंटिंगची व वॉटर कलरची चित्रे काढण्याचा अभ्यास सुरू केला. त्यात त्यांनी लवकरच प्रावीण्य संपादन केले. त्यांनी शिल्पशास्त्रासंबंधी आणि यंत्रशास्त्रासंबंधी नकाशे काढण्याचा उद्योग सुरू केला. या कार्यात नंतर भिसे यांना आश्चर्यकारक यश लाभून लंडनच्या ‘सोसायटी ऑफ आर्किटेक्ट’ या संस्थेने त्यांना आपले सन्माननीय सभासद करून घेतले.
भिसे यांचे शोध
पुढील स्टेशनचे नाव दर्शविणारे स्वयंचलित यंत्रः आगगाडीच्या डब्याला लावले म्हणजे त्यावरून मागे किती स्टेशने गेली, सांप्रत गाडी कोणत्या स्टेशनात आली आहे, पुढे कोणते स्टेशन येणार आहे आणि तेथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती प्रवाशांना मिळण्याची सोय होणार होती. इंजिन ड्रायव्हर अथवा गार्ड यांच्या मदतीशिवाय आपोआप यंत्र चालावे अशी योजना या यंत्रात होती. या शोधाचे 1896 साली हिंदुस्थान सरकारकडून पेटंट घेण्यात आले.
आगगाडीचा स्वयंचलित दरवाजाः पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. असा अपघात टळावा म्हणून शंकररावांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले अथवा कोणीही निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे भिसे यांनी पेटंट घेतले नाही. या दरवाजाचे तयार केलेले नमुने 1898 मध्ये मुंबईत भरलेल्या प्रदर्शनात ठेवले होते. त्याला प्रदर्शन समितीकडून बक्षीस मिळाले.
पगडय़ा तयार करण्याचे यंत्रः या यंत्रामुळे हलक्या, मजबूत व टिकाऊ राहून डोक्यास अलगदरीत्या बसणाऱ्या अशा पगडय़ा तयार होत होत्या. मुख्य फायदे म्हणजे अशी तयार झालेली पगडी थोडक्या खर्चात पुन्हा दुरुस्त करता येत असून किंमत अवघी आठ आण्यांपर्यंत पडे.
जाहिरात दाखविणारे यंत्रः अनेक जाहिरातींचे एकदम आपोआप प्रदर्शन करणारा दिवा ही युक्ती नवीन होती. यंत्रातील अक्षरे काही सेकंदांपर्यंत निरनिराळ्या रंगीबेरंगी व बदलत जाणाऱ्या प्रकाशात दिसत. नंतर थोडय़ा अवधीत ती जाहिरात बदलून दुसरी जाहिरात दिसण्याची सोय त्यात करण्यात आली होती.अशा जाहिराती आवश्यक तेवढा वेळच दिसत.भिन्न भिन्न रंगांत दिसणारी व सजीव प्राण्याप्रमाणे नाचणारी चित्रेही दाखविण्याची योजना या यंत्रात अंतर्भूत होती. केवळ किल्लीने वा विजेच्या सहाय्याने चालणारी अशी दोन्ही प्रकारची रचना या यंत्रात केलेली होती. त्याचा उपयोग रात्री किंवा दिवसा करता येत असे. या यंत्राचा शोध भिसे यांनी 1899 च्या दरम्यान लावला.
मलवाहक यंत्रः पाण्याचा मोठा प्रवाह पडत शौचकूप साफ व्हावे अशी या यंत्रात रचना होती. हे यंत्र आकाराने लहान असून शौचकुपात आणलेल्या पाण्याच्या तोटीस हे यंत्र लावले असता त्याचे बटण दाबताच त्या यंत्रातून पाणी शौचकुपात फार जोराने वाहत असे व नियमित पाणी निघून जाताच त्या यंत्राचे कार्य बंद होई. या यंत्राचा शोध 1900 साली लावला.
भिसे टाईप यंत्रः 1901च्या दरम्यान या यंत्राचा शोध लावला. भिसे टाईप पध्दतीत अक्षरांचे सुटे टाईप जुळले जात असताना दोन शब्दांच्या मध्ये जागा सोडण्याचे कार्य यंत्रात आपोआप होई. जुळलेल्या टाइपांची ओळ झाली की, ती किती व्हायची राहिली आहे हे दाखवणारा एक सूचक या यंत्राला जोडलेला होता. पूर्वी उपलब्ध असलेल्या यंत्रातील अनेक त्रुटी या यंत्रात नसल्यामुळे हे यंत्र लोकप्रिय झाले होते.
टाईप पाडणारे यंत्रः 1914 साली टाईप पाडणाऱ्या कारखानदारांस विशेष उपयोगी पडणारे यंत्र तयार केले. शंकररावांच्या या यंत्राने मुद्रण क्षेत्रात एक नवीन युग निर्माण केले. हे नवीन यंत्र 1916 मध्ये बाजारात विक्रीसाठी आले.
रसायनशास्त्रातील शोधः 1917 मध्ये ‘शेला’ या नावाच्या वॉशिंग कंपाऊंडचा शोध लावला, परंतु आर्थिक स्थिती असमाधानकारक असल्याने भिसे यांनी या शोधाचे सर्व हक्क एका इंग्लिश कंपनीस विकले. या मालामुळे त्या कंपनीला लाखो रुपयांचा नफा झाला.
भिसे यांनी ‘बेसलिन’ नावाचे औषध शोधून काढले. हे औषध ताप, पायोरिया आणि चामडीचे रोग यावर गुणकारी ठरले. कालांतराने ‘बेसलिन’चे नामकरण ‘आटोमिडीन’ असे करण्यात आले होते.
विद्युत शास्त्रातील शोध
यंत्रशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्या अभ्यासाशिवाय विद्युत शास्त्रातही भिसे यांनी प्रगती केली होती. विद्युत शक्तीच्या सहाय्याने हवेतील भिन्न भिन्न वायूंचे पृथक्करण करण्याची योजना हा त्यांचा पहिला शोध. 1906 साली तारेने दूरवर फोटो पाठविण्याची युक्ती त्यांनी काढली. या शोधाचे पेटंट त्यांनी त्याच वर्षी घेतले. त्यांनी सूर्यकिरणांच्या शक्तीवर चालणाऱ्या मोटरचा शोध 1918 साली लावला. भिसे यांनी काही लहान यंत्रेही तयार केली. त्यात ‘टिंगी’ नावाचे एक लहान यंत्र होते. त्याने अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत. याखेरीज डोके दुखत असल्यास शिरा चेपणारे यंत्र तसेच चटण्या वगैरे सहज वाटण्यास जात्यासारखे यंत्र बनवले. भिसे यांनी सुमारे 200 शोध आणि त्यानिमित्त 40 च्या वर पेटंट घेतली.
डॉ. शंकर आबाजी भिसे यांनी संशोधन केले, नवीन शोंध लावले, यंत्रे तयार केली, कारखाने सुरू केले, सामाजिक संस्था स्थापन केल्या. योग, ध्यानधारणा यांच्यासह विविध विषयांवर व्याख्यानं दिली. विविध विषयांवर लेख लिहिले. ‘ताजमहाल’ ही कादंबरी लिहिली. भिसे यांच्या कार्याची दखल परदेशात मोठय़ा प्रमाणात घेण्यात येऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्या मानाने हिंदुस्थानात त्यांची फारशी दखल घेतली नाही. पुढे ते अमेरिकेत गेले आणि न्यूयॉर्क येथे 7 एप्रिल, 1935 रोजी त्यांचे निधन झाले. भिसे यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल झाले. त्यांच्या कार्याबद्दलची माहिती व त्यांची महती पुढील पिढीला कळावी यासाठी जयंत बाळकृष्ण कुळकर्णी यांनी 1969 साली प्रकाशित केलेल्या ‘डॉक्टर भिसेः व्यक्ती आणि कार्य’ या चरित्राची नवीन आवृत्ती प्रकाशित करावी, त्याचे विविध भाषेत भाषांतर करावे, त्यांची माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.



























































