
>> प्रशांत गौतम
साहित्य पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ लेखक, पत्रकार महावीर जोंधळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात आज (दि. 8 एप्रिल) सत्कार होत आहे. चार दिवसांपूर्वी त्यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. 2 तारखेला मसापच्या सभागृहात सत्कार झाला होता.
अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या महावीरभाईंचा विविध क्षेत्रांतील मित्र परिवाराचा किती मोठा गोतावळा आहे हे यावरून आपल्या लक्षात येईल. (आपला प्रत्येक शब्द परिवर्तनाचा ध्यास घेऊन कागदावर उमटवणारे, लेखणीला शस्त्र्ा करून क्रांतिकार्यात उतरवण्याची बांधिलकी स्वीकारणारे, आपले सखोल ज्ञान काचेच्या मनोऱयात बंद करून न ठेवता पुढच्या पिढीसाठी त्याची कायम दारे खुली करून ठेवणारे साहित्यिक, पत्रकार) अशी चपखल सुरुवात या निमंत्रण पत्रिकेची आहे. यावरूनही या वेगळय़ा व्यक्तिमत्त्वाची आपल्याला ओळख पटू शकते. 1970 ते 80 चे दशक हे तर विविध आंदोलनं आणि आणीबाणीचे होते. तत्कालीन सामाजिक, राजकीय घटनांनी त्यांना प्रभावित केले. 1970ते 2007 पर्यंत त्यांनी दै. मराठवाडा, लोकमत, प्रभातचे सह संपादक, संपादक पद भूषवले. दैनिकांच्या रविवार पुरवण्या असोत की दिवाळी अंक असोत, ती महावीरभाईंच्या साक्षेपी संपादनातून लक्षवेधी ठरली. या निमित्ताने त्यांनी अनेक नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आज लोकप्रिय असणारे आघाडीचे अनेक लेखक, कवी त्या काळात नवखे असताना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. एखादा लेखक, कवी दमदार लेखन करू शकतो, अशी आश्वासक खात्री पटल्यावरच भाई त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांची ‘बिनपटाची चौकट’ हे आत्मकथन तर वेगळ्या वाटेवरचे आहे. महावीरभाईंनी सकाळ, साप्ताहिक साधना, मनोहर, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, केसरी अशा साप्ताहिक, दैनिकांत त्यांनी स्तंभलेखन केले. त्यांच्या बाबतीत खास सांगायचे म्हणजे पत्रकारितेसोबतच ललित, बालसाहित्य, वैचारिक, कथा, लघुकथा, कादंबरी, व्यक्तिचित्रण, कविता, संपादन कार्य या क्षेत्रांत त्यांनी आपली म्हणून स्वतंत्र नाममुद्रा उमटवली आहे. अनेक राष्ट्रीय चर्चासत्रांत शोधनिबंधाचे सादरीकरण केले, देश-विदेशातील अभ्यास दौऱयात ते सहभागी झाले. इयत्ता 5 वी ते 8 वी भाषा माध्यमांसाठी मराठी विषयांवर पुस्तकांसाठी त्यांनी लेखनही केले. गोमंतकालीन इयत्ता आठवीसाठी 2002 ते 2007 या काळात पाठलेखन केले. त्यांचा ‘वर्तुळ’ हा ललित लेख अकरावीच्या मराठी पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. बारावीसाठी ‘गर्द झाडातील सासवने’ हा ललित लेख विद्यार्थी अभ्यासतात. ‘करवंदी आभाळ’ या पुस्तकाचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. तर बी.ए.साठी ‘पडवळ’ नावाची कथा अभ्यासली जाते. पत्रकारितेतील क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखाची पुस्तके वारी, तोल, जनगोत या शीर्षकाच्या तीन खंडांत प्रकाशित झाली. शिवाय ‘पत्रकारिता ः स्वरूप व चिकित्सा’ हा ग्रंथही पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. सत्तरेक पुस्तकांची साहित्यसंपदा त्यांच्या नावे जमा असून मुलांसाठी 16 पुस्तके आहेत. यातीलच महत्त्वाचे म्हणजे बालकुमार साहित्य आशयसूत्र आणि लयतत्व, माध्यम प्रदेश ः पथ्य आणि तत्त्व, हे सांगता येईल. मधुकरराव चौधरी ः व्यक्ती आणि कार्य, व्यंकटेश माडगूळकर व्यक्ती आणि लेखन, मराठी वाङ्मय इतिहासाचे पुनर्लेखन, किशोर मासिकातील उत्कृष्ट लेखन हे त्यांचे संपादन कार्य महत्त्वपूर्ण असेच आहे. नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य संस्कृती मंडळ, मसाप पुणे व छत्रपती संभाजीनगरचे सदस्यपद तसेच महाराष्ट्र साहित्य पत्रिका, प्रतिष्ठान कुमार कोश वाई, राज्य प्रौढ शिक्षण नियामक मंडळाच्या संपादक मंडळातील सदस्यपद त्यांनी भूषवले. साहित्य व पत्रकारितेतील विविध पुरस्काराने ते सन्मानित झाले. अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदांसह विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. हा सर्व प्रवास महावीरभाईंनी ‘गवतात उगवलेली अक्षरे’ या आत्मकथनात मांडला. भाई परखड, स्पष्टवत्ते, फटकळ आहेत, त्यामुळे त्यांच्या पहिल्या भेटीत चटकन कुणी प्रेमात पडत नाही. मात्र एखाद्याची मैत्री जमली की भाई त्यांच्यातल्या माणूसपणावर भरभरून प्रेम करतात. ते मूल्य जपणारे आहेत. ही तत्त्वे त्यांनी आयुष्यभर जपलेली आहेत. या प्रवासात अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद असो की साहित्य अकादमी पुरस्कार असो; असे महत्त्वाचे सन्मान त्यांच्याकडे आजपर्यंत आले नाहीत आणि ती त्यांनी कधी अपेक्षा ठेवली नाही, लेखन व कार्य यात कायम सातत्य राखले. लेखनासोबतच पत्रकारिता व सामाजिक कार्य, साहित्य चळवळी अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने वयाचा अमृत महोत्सवी टप्पा गाठला आहे.































































