आरोग्य – शरीरातील दाह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. कौशल छत्रपती

हृ दयविकाराचा झटका हा सर्वात गंभीर विकार आहे. जवळजवळ पंचवीस टक्के लोक हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी कारणांमुळे जीव गमावतात. हृदयविकाराच्या उपचारांमध्ये सध्या नावीन्यपूर्ण झेप घेतली जात असली तरी या आजाराचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हृदयविकार असलेल्या सर्व रुग्णांना उपचारांदरम्यान दिल्या जाणाऱ्या आघाडीच्या औषधांपैकी एक आहे ‘स्टॅटिन्स’! याचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते दाहविरोधी आहे. त्याचा प्रभाव कॉलेस्टेरॉल कमी करण्याच्या गुणधर्माइतकाच महत्त्वाचा ठरतो. आपल्या शरीरात कोणत्याही दुखापतीशिवाय दाह असेल तर तो चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणारा आजार असू शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका हे सर्व आपल्या शरीरात दीर्घकाळ दाह झाल्यामुळे होत असल्याचे आढळून येतात.

आपल्या शरीरात ही दाहक अवस्था कशामुळे निर्माण होते? स्वास्थ्याला हानीकारक असणाऱ्या आहाराच्या सवयी हे प्रमुख कारण आहे. जास्त शर्करायुक्त आहार, जास्त प्रमाणात ट्रान्सफॅट असलेले पदार्थ (जसे की पॅकेज फूड, रस्त्यावरील वडापावसारखे खाद्यपदार्थ), उच्च सोडियमयुक्त आहार आणि हवाबंद डब्यातील पदार्थ  शरीरात दाह निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. लठ्ठपणा हा एक तीव्र दाहक अवस्था निर्माण करणारा आहे. झोपेची कमतरता, वायुप्रदूषण, मानसिक आणि शारीरिक ताण, व्यायामाच्या अभावासह असलेली बैठी जीवनशैली या सर्व गोष्टी शरीरात तीव्र दाह निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात, परंतु योग्य आहार-विहाराने हे बदलता येऊ शकते. त्यासाठी काही गोष्टी सहजपणे टाळता येऊ शकतात.

डिटॉक्स करणारा आहार दाह नियंत्रित करण्याचा दावा करतात आणि तो वाढत्या वेलनेस इंडस्ट्रीचा भाग आहे. 99 टक्के दावे हे फसवे असतात. ज्यूस पिणे किंवा बॉडी क्लीनिंग कॅम्पसाठी जाणे या गोष्टी दाहापेक्षा शरीर स्वच्छ करतात, पण योग्य आहाराचे सेवन, पुरेशी झोप व नियमित व्यायामाने दाह कमी होण्यास मदत होऊ शकते. मनशांतीसाठी मेडिटेशन केल्यास तसेच  श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करण्याने दाह नियंत्रित राहण्यास मदत होते.

 (लेखक वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत)