आजरा बस स्थानकाचे शिवसेनेनेच केले उद्घाटन, बांधकाम पूर्ण होऊनही मुहूर्त मिळेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले अनेक दिवस आजरा येथील बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण होऊनही त्याचे उद्घाटन रेंगाळले होते. यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या बसस्थानकाला प्रतीकात्मक तोरण बांधून उद्घाटन केले. जिल्हाप्रमुख विजय देवणे व उपसंघटक संभाजी पाटील तसेच तालुकाप्रमुख युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली आजऱ्यातील शिवसैनिकांनी घोषणा देत या प्रलंबित वास्तूचे उद्घाटन केले. या विलंबास जबाबदार घटकांचा यावेळी निषेध करण्यात आला.

जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांनी वास्तूंच्या देखरेखीकडे लक्ष ठेवावे. आजरा बसस्थानकासह धूळ खात पडलेल्या नवे पोलीस ठाणे आणि आजरा क्रीडा संकुल इमारतींचे उद्घाटन करून संबंधित विभागाकडे त्यांचे हस्तांतर करावे; अन्यथा येत्या आठ दिवसांत या दोन्ही इमारतींचे उद्घाटन आम्हीच प्रतीकात्मक स्वरूपात करू.

तालुकाप्रमुख युवराज पवार यांनी आजरा बसस्थानक मंजुरीपासून शिवसेनेने केलेल्या आंदोलनांची आठवण करून दिली. आजरा बसस्थानक म्हणजे शिवसेनेच्या आंदोलनाचे यश आहे. 1972 पासून पत्र्यांच्या गाळ्यातल्या गळक्या बसस्थानकाच्या दुरुस्तीचा प्रश्न घेऊन शिवसेनेच्या संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये पहिले आंदोलन झाले. 2014 मध्ये शिवसेना नेते, तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या वास्तूसाठी 75 लाखांचा निधी मंजूर केला. 2018 नंतर काम सुरू होऊन वास्तू उभी राहिली; पण लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आता प्रतीकात्मक उद्घाटन करावे लागले. उपसंघटक पाटील म्हणाले, शिवसेनेच्या रेटय़ामुळेच ही वास्तू दिमाखात उभी राहिली असून, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने हस्तांतर आणि उद्घाटन रेंगाळले आहे. म्हणूनच शिवसेनेला हे उद्घाटन करावे लागले आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख संजय येसादे, शहरप्रमुख ओमकार माध्याळकर, युवासेनेचे महेश पाटील, विभागप्रमुख दिनेश कांबळे, सुनील डोंगरे, अरुण कांबळे, नारायण कांबळे आदींसह शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.