अवलिया – ऑटो-सोमेश!  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश उदगिरकर 

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते.  हे  तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

पहिल्या भेटीत मला ‘काका’चा दर्जा देणारा ऑटोचालक म्हणजे सोमेश! याचं कारण म्हणजे हा ‘हिच्या’ माहेराकडून ओळखीचा. त्यामुळे माझे लग्न जेव्हा झालं तेव्हा माहेरचा एखादा दगड जरी दृष्टीला पडला तर ही गहिवरायची आणि हा तर जिवंत हाडामांसाचा माणूस. त्यामुळे सोमेश आमच्या घरात विरघळून जाणे अपेक्षितच होतं. सोमेशचं व्यक्तिमत्त्व थोडं ‘हटके’ होतं. अंगकाठी ही अक्षरश: ‘काठी’च होती! डोक्यावर मागे वळवलेले दाट पांढुरके केस. भुवया आणि डोळे झाकून टाकणारा सोडावॉटरच्या बुडाशी स्पर्धा करणाऱया अंतर्गोल काचांचा चश्मा, सरळ नाकाखाली मिश्यांचा पाचुंदा, गालाची हाडे नको तितकी वर आलेली. हनुवटी आणि गालाच्या वर आलेल्या हाडांमध्ये वाढलेल्या दाढीनं बस्तान ठोकलेलं. अंगात ढगळ पॅंट आणि वर हॅंगरला अडकवल्यासारखा शर्ट! चेहऱयावर कायम एक स्मित रेखलेले! ऑटोच्या व्यवसायात इतका भावनाप्रधान माणूस मी कधीच पाहिला नाही. बोलणं शुद्ध आणि मुद्धेसूद. शिवाय कुणाशीही बोलताना आर्जव असणार. उद्धटपणा नावालाही नसायचा.   

त्याचं एक स्वप्न होतं. नोकरी करण्याचं. दहा ते पाच काम करून उरला वेळ बायकोपोरांमध्ये घालवायचे ते त्याचे स्वप्न कधीच पुरे होऊ शकले नाही. नाही म्हटलं तरी त्याने नोकरीसाठी लाख प्रयत्न केले, पण ती नशिबात नव्हती. तरी त्यानं प्रयत्न सोडले नाहीत. त्या दहा ते पाचचा त्याच्यावर इतका पगडा होता की, हा रोज सकाळी दहा वाजता ऑटो बाहेर काढायचा आणि सायंकाळी पाच वाजता घरी आणून लावायचा! लगेच बायकोमुलांसह तयार होऊन बाहेर फिरायला जायचा. पुढे पुढे हे परवडेनासे झाले. त्यावेळी त्याने एक धाडसी निर्णय घेतला. ऑटोच विकून टाकली आणि खासगी नोकरी धरली. तिथेही अपेक्षाभंग झाला. सकाळी दहाची वेळ साधली होती, पण घरी यायची वेळ निश्चित नव्हती. प्रचंड काम आणि वेळखाऊ नोकऱया त्याने केल्या. सोमेश चांगला सुशिक्षित होताच, पण त्याही पलीकडे एक दुर्मिळ गुण त्याच्यात होता, तो म्हणजे प्रामाणिकपणा! जोडीला सचोटी आणि तल्लख बुद्धी! त्यामुळे व्यापारी वर्गात त्याला मागणी होती, पण कामाच्या वेळा मात्र आड यायच्या! नाइलाजाने त्याला त्या अॅडजस्ट कराव्या लागल्या.   

माझ्या जवळच तो राहत असल्यामुळे आमच्या भेटी नेहमीच व्हायच्या. किंचित सानुनासिक स्वरात “काय काका, काय चाललंय?” म्हणत तो घरात यायचा. कधी आम्ही त्याच्याकडे जायचो. हिच्याशी मात्र तो एकेरी बोलायचा. तसा हा तिचा भाऊच लागत होता. त्याची ऑटो असताना आम्ही त्याला बोलवायला थोडी टाळमटाळ करायचो. त्याची दोन कारणे होती. एकतर त्याचे चालवणे! त्याच्या जाड चष्म्यातून पाहत तो तिरके बसून तुफान वेगाने ऑटो चालवायचा! एकदोनदा तर अपघात होता होता आम्ही वाचलो होतो! दुसरे कारण तो आमच्याकडून कधीच पैसे घ्यायचा नाही. अगदी नाईलाज झाला तरच त्याला बोलवायचो. एकदोनदा मी त्याला वडीलकीने दटावूनही पाहिलं, पण त्यानं दाद दिली नाही. “बहिणीकडून पैसे घेऊ का?” हा रोकडा सवाल तो फेकायचा. त्यामुळं त्याने जेव्हा त्याची ऑटो विकली त्यावेळी मला जितके वाईट वाटले, त्यापेक्षा काकणभर थोडे बरेही वाटले होते.   

आता परिस्थिती बदलली आहे. त्याचा मुलगा नोकरीला लागला. चांगल्या मोठय़ा पोस्टवर तो आहे. वडिलांनी आयुष्यभर जे स्वप्न पाहिलं होतं त्याची पूर्तता त्याने करून दाखवली आहे. मुलगी सुस्थळी पडली, काळजी घेणारा सुस्वभावी जावई मिळाला. आयुष्यभर कष्ट उपसलेल्या सोमेशरावांनी आता ‘सेवानिवृत्ती’ स्वीकारली आहे. मनाप्रमाणे जगण्याचं त्यांना उशिरा का होईना, स्वातंत्र्य लाभलं आहे. एरवीची स्मितहास्याची उपजत देणगीची जागा आता खळखळत्या हसण्याने घेतली आहे!   

परभणीने मला काय दिलं? असं कुणी मला विचारलं तर अशा कितीतरी ‘श्रीमंत’ व्यक्तींची नावे मी झोपेतून उठूनही सांगू शकतो, त्यात सोमेश अग्रामावर असेल!  

[email protected]