
उन्हाळी सुट्टीनिमित्त मामाच्या गावी जाण्याचा बेत आखणाऱ्यांना खूशखबर आहे. सर्वसामान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने पुढील दोन महिने दररोज तब्बल 441 उन्हाळी स्पेशल विशेष गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या राज्यभरात दररोज जवळपास तेरा हजार नियमित गाडय़ा धावतात. सध्या राज्य सरकारने एसटीमध्ये महिलांना 50 टक्के सवलतीत प्रवास उपलब्ध करून दिला आहे. तसेच शाळांना उन्हाळी सुट्टय़ा लागल्याने एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने विभागनिहाय विशेष जादा गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विशेष गाडय़ा चालवताना प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे निर्देशही दिले आहेत. एसटी महामंडळाने जादा गाडय़ांचे विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर-32, बीड-27, लातूर-16, नांदेड- 12, धाराशीव-10, परभणी-27, पालघर-23, रायगड-13, रत्नागिरी -19, सिंधुदुर्ग-20, ठाणे-25, वर्धा-6, कोल्हापूर-6 एवढय़ा जादा गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.



























































