ठसा – कॉ. सुरेश धोपेश्वरकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देविदास तुळजापूरकर

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे माजी अध्यक्ष, पद्मश्री प्रेमा पुरव यांनी स्थापन केलेल्या अन्नपूर्ण संस्थेचे अध्यक्ष, याच संस्थेच्या ‘संवाद’ मासिकाचे संपादक, श्रमिक प्रतिष्ठानचे विश्वस्त कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर यांचे नुकतेच निधन झाले. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता. त्यामुळेच ते सुरुवातीला गिरणी कामगारांच्या चळवळीकडे आकृष्ट झाले. वयाच्या विसाव्या वर्षी 1962 मध्ये महाराष्ट्र बँकेत ते रुजू झाले. तेव्हापासून बँक कर्मचारी चळवळीचा ते अविभाज्य भाग बनले. मध्यमवर्गीय बँक कर्मचाऱयांना संघटित करण्यात, त्यांना समग्र कामगार चळवळीचा भाग बनविण्यात आणि त्यांच्यात वर्गीय जाणिवा निर्माण करण्यात, त्यांच्यात प्रगत, पुरोगामी विचार रुजविण्यात त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

बँक कर्मचारी चळवळीत काम करत असताना सुरुवातीला बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे, यासाठी त्यांनी जनमत संघटित केले. नंतर राष्ट्रीयीकृत बँकिंग उद्योगाचे संचलन नीट करण्यात यावे, या बँकांनी जनपेंद्रित धोरणे राबविली जावीत यासाठी ते सतत झटले. राष्ट्रीयीकृत बँकिंग उद्योगातून कार्यसंस्कृतीत सुधारणा व्हावी, ग्राहकसेवेबाबत बँक कर्मचाऱयांनी संवेदनशील राहावे, यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. कामगार संघटना म्हणून जबाबदार भूमिका घ्यावी, चुकीच्या धोरणावर कठोर टीका करत असतानाच पर्यायाबद्दल सतत ते आग्रही असत.

वयाच्या तिसाव्या वर्षी महाबँकेच्या संचालक मंडळावर कर्मचाऱयांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी, महाराष्ट्र राज्यातील सर्व बँकांतील कर्मचारी, देशभरातील ग्रामीण बँकांतील कर्मचाऱयांना संघटित करण्यात त्यांचे योगदान मोलाचे होते. देशातील सगळय़ात मोठे राज्यनिहाय बँक फेडरेशन, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते तर अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे ते प्रथम जॉइंट सेव्रेटरी, नंतर सेव्रेटरी व अखेर अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. या काळात बँक कर्मचाऱयांना पगारवाढ, पेन्शन मिळवून देण्याच्या अनेक करारांना आकार देण्यात त्यांचे योगदान मोठे होते. 1984 साली बँपिंग उद्योगात यांत्रिकीकरणाचा पहिला करार झाला. यानंतर 1987 व 1989 मध्ये त्याचा विस्तार करणारे करार झाले. या सर्व करारांना आकार देण्यात, कर्मचाऱयांचे हित जोपासत आधुनिक तंत्रज्ञान बँपिंग उद्योगातून कार्यान्वित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बँक, विमा, वीज, राज्य सरकारी कर्मचारी संघटनांत समन्वय ठेवत व्यापक एकजूट उभी करण्यात ते क्रियाशील असत. नवीन आर्थिक धोरण, खासगीकरण, उदारीकरण यांच्याविरोधात अनेक लढे उभारले, जनमत संघटित केले. नैसर्गिक आपत्ती जसे की, भूपंप, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ यात बँक कर्मचाऱयांनी पुढाकाराने मदत केली पाहिजे म्हणून ते सतत आग्रही असत. बँक कर्मचाऱयांनी समाजोपयोगी कामे हाती घ्यावीत, यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर एक चतुरस्र वक्ते होते. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. कुठल्याही विषयाची मांडणी करताना ते जागतिक परिप्रेक्षातून याविषयाची मांडणी करत असत. तसेच त्यांची मांडणी नेहमीच वस्तुनिष्ठ असे. बँक कर्मचारी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा सहभाग होता. चळवळीशी संबंधित विषयावर पुस्तिकांचे प्रकाशन, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे आणि विविध प्रश्नांवर उभारण्यात आलेले लढे यातून त्यांनी महाराष्ट्र राज्यातून बँक कर्मचारी चळवळीतील अनेक कार्यकर्ते घडवले. त्यांना एक व्यापक दृष्टी मिळवून दिली आणि म्हणूनच आज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतदेखील बँक कर्मचारी संघटना नेहमीच लढाऊ, अग्रेसर, क्रियाशील दिसतात. बँक कर्मचारी चळवळीसाठी वयाच्या 82 व्या वर्षीदेखील ते मार्गदर्शक होते, तत्त्वज्ञ होते, मित्र होते, स्फूर्तिस्थान होते, आदर्श होते. कार्यकर्त्यांसाठी ते एक चालते-बोलते विद्यापीठ होते. आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत ते बँक कर्मचारी चळवळीला दिशा देण्यासाठी, कार्यकर्ते घडविण्यासाठी ते झटत राहिले आणि म्हणूनच खऱया अर्थाने बँक कर्मचारी चळवळीसाठी कार्यकर्त्यांसाठी ते चालते-बोलते विद्यापीठ होते. हे सुरेश धोपेश्वरकर नावाचे एक चालते-बोलते विद्यापीठ निःशब्द झाले.

(लेखक हे महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेव्रेटरी आहेत)