
>> आरती देवगावकर
संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. कमी पाण्यावर, खडकाळ जमिनीतसुद्धा अगदी उत्तम पद्धतीने घेता येणारी ही धान्ये शेतकऱ्यांसाठीसुद्धा आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायद्याची आहेत. यांच्या या बहुगुणी उपयोगामुळेच त्यांना देवधान्ये हे नाव पडले असावे. थोडक्यात काय तर ही अशी मिलेट्स म्हणजेच देवधान्ये फार पूर्वीपासून आपल्याकडे घेतली जातात. जी जमिनीचं, आपलं आणि एकूण पर्यावरणाचं आरोग्य चांगलं ठेवतात.
संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. आपल्या पूर्वजांना ही मिलेट्स माहीत होती. आपल्याकडे पूर्वापार त्यांचा वापर होत होता. फक्त तेव्हा त्यांना मिलेट्स असे म्हटले न जाता ‘भरड धान्ये’ असे म्हटले जाई.
मिलेटमध्ये इतर धान्यांच्या तुलनेत प्रोटिन,
कॅल्शियम, फायबर जास्त प्रमाणात आढळून येतात. डॉ. खादर वली (मिलेट मॅन) यांनी केलेल्या संशोधनानुसार निगेटिव्ह, न्यूट्रल आणि पॉझिटिव्ह धान्य अशा तीन गटांत धान्यांची वर्गवारी करता येते. निगेटिव्ह धान्य म्हणजे गहू-तांदूळ यांसारखी धान्ये, ज्यात तंतुमय पदार्थ दोन टक्क्यांहून कमी असतात. ही धान्ये जास्त प्रमाणात खाल्ल्यास रोगांना आमंत्रण देऊ शकतात. न्यूट्रल धान्य म्हणजे ज्वारी, बाजरीसारखी धान्ये. त्यांनी कोणतेही नवीन रोग तर होत नाहीत, पण असलेले रोग दूरही होत नाहीत. पॉझिटिव्ह धान्य म्हणजे राळे, सावा, हिरवी कांग, कोदो, भगर अशी धान्ये, ज्यांच्यातील गुणधर्मामुळे रोगसुद्धा बरे होतात.
ज्वारी, बाजरीचा आपल्या आहारात मोठ्या प्रमाणावर वापर होतो. एकूण मिलेट्सच्या उत्पादनामध्ये ज्वारीचा वाटा जवळपास 60 टक्क्यांएवढा आहे. जगातील हे पाचव्या क्रमांकावर घेतले जाणारे पीक आहे. मूळ आफ्रिकेतील ज्वारी अंदाजे 5000-8000 वर्षांपूर्वी जगभरात, तर हिंदुस्थानात अंदाजे 4500 वर्षांपूर्वी पोहोचली. सध्या जगातील 100 पेक्षा जास्त देशांत ज्वारीचे पीक घेतले जाते. ज्वारीच्या जोडीला येणारी बाजरी हेदेखील अतिशय प्रसिद्ध मिलेट आहे. परिणामाला उष्ण असणारी बाजरी आणि थंड असणारी नाचणी यांचे सेवन फायदेशीर ठरते.
हिंदुस्थानात इ.स.पूर्व 2600 पूर्वी हडप्पा संस्कृतीत भगर होती. उपवासाला चालणारी, पचनाला हलकी असणारी वरई म्हणजेच भगर. ही जखम भरून येण्यासाठीदेखील उपयुक्त आहे. सध्या हिंदुस्थानात मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड या राज्यांत मोठ्या प्रमाणात वरईचे उत्पादन होते. ही मिलेट आकाराने सगळ्यात लहान असून पिवळसर पांढऱ्या रंगाची दिसते. आफ्रिका खंडातील अनेक आदिवासी जमाती तसेच श्रीलंका, नेपाळ, म्यानमार इत्यादी देशांतील आदिवासींच्या आहारातील मुख्य स्रोत आहे.
असेच आणखी एक प्राचीन हिंदुस्थानी आणि जगातही इतरत्र काही देशांत उगवणारे फॉक्सटेल मिलेट म्हणजेच राळा. पिकाचा तुरा लांब, गोलाकार असून कोह्याच्या शेपटीप्रमाणे दिसतो म्हणूनच याला फॉक्सटेल (कोह्याचे शेपूट) मिलेट म्हणतात. हे मिलेट हिरव्या, पिवळ्या, लाल अशा विविध रंगांत आढळते. जगात होणाऱ्या मिलेट्समध्ये याचा तिसरा क्रमांक लागतो. युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. याला इटालियन मिलेट तसेच जर्मन मिलेटसुद्धा म्हणतात. चीनमधल्या लाजिया या ठिकाणी 4000 वर्षांपूर्वीचं व्यवस्थित राखून ठेवलेले नूडल्सचे भांडे सापडले, ज्यात राळ्याचा अंश आहे. आपल्या हिंदुस्थानातसुद्धा हडप्पा संस्कृतीच्याही अगोदर राळे असल्याचे पुरावे सापडले आहेत. यात मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्याने शाकाहारींसाठी हे उत्तम आहे.
हिमालयाच्या परिसरात जास्त उत्पादन होत असल्याने लालसर करड्या रंगाच्या कोदो मिलेटला हिमालयन मिलेटदेखील म्हणतात. मूळ आफ्रिकेतील हे मिलेट साधारण 3000 वर्षांपूर्वी हिंदुस्थानात आले. मध्य प्रदेश, छत्तीसगढ व झारखंड भागातील आदिवासी शेतकऱ्यांचे हे मुख्य अन्न आहे. ब्राऊन
टॉप मिलेटला हिंदीत हरी कांगनी किंवा छोटी कांगनी, तर मराठीत जुने लोक हरीक म्हणतात. याचे मूळ हिंदुस्थानातच आहे. इ.स.पूर्व 3000 वर्षांपूर्वी दक्षिण हिंदुस्थान आणि नैऋत्य हिंदुस्थानात ब्राऊन टॉप मिलेट सापडले, असे अभ्यासक सांगतात. उत्पादन क्षमता कमी असल्याने हळूहळू हे मिलेट मागे पडू लागले. मात्र तरीही इ.स.सातव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात पैठण येथे ब्राऊन टॉप मिलेटचे उत्पादन होत असे याचे पुरावे मिळतात. ब्राऊन टॉप मिलेट फिकट हिरवे व थोडे पोपटी रंगाचे दाणे असून दाण्याचा वरील भाग हलका ब्राऊन असतो. म्हणून याला ब्राऊन टॉप (वरचा भाग लाल असलेली मिलेट) म्हणतात. यात असणाऱ्या प्रथिनांमुळे आपला मुख्य आहार असलेल्या पोळीसाठी हे उत्तम आहे. उडीद डाळीचे पीठ आणि उकडलेला बटाटा वापरून किंवा मग पिठाची उकड काढून त्याची मऊ पोळी करता येते.
युरेशियातून 4000 वर्षांपूर्वी सावा किंवा इंग्रजीतील बानयार्ड मिलेट हिंदुस्थानात आले. सावा हे चवीला गोडसर असल्याने मुलांना हे आवडते. भूक कमी झाली असेल तर आठवड्यातून दोनदा साव्याची आंबील किंवा लापशी खाण्याने फायदा होतो. मिलेट खाण्याची सुरुवात करण्यासाठी उत्तम असणारे हे मिलेट शरीर स्वच्छ ठेवण्याचे काम करते. मानवी शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना स्वच्छ ठेवण्यासाठी आणि मधुमेह, मुतखडा वा इतर अंतर्गत अवयवांशी निगडित आजार लांब ठेवण्यासाठी हे मिलेट सहाय्यभूत ठरते. हिंदुस्थानात प्रामुख्याने ओडिशा, महाराष्ट्र, तामीळनाडू, बिहार, पंजाब, गुजरात या राज्यांत याचे उत्पादन होते.
मिलेटपासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. पोळी, भाकरी, भात अशा रोजच्या जेवणातील पदार्थांपासून ते कल्पनाशक्तीचा वापर करून रसनातृप्तीसाठी इडली, डोसा, उपमा, खीर, माडगं, आंबील करता येते. त्याच सोबत मिलेटचे बिस्कीट, लाडू, शेवया, नूडल्स, पोहे, मुरमुरे, लाह्या, पफ्स बनवता येतात.
मिलेट्स वापरताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. मिलेट्स भिजवून मगच वापरावीत. आठ तास भिजवल्याने मिलेट्समधील अनेक गुणधर्म कैक पटींनी वाढतात. मिलेट भिजवताना वापरलेले पाणी फेकून देऊ नये, त्याचा वापर करावा. मिलेटला असणारा रंग त्याच्यामध्ये असणारे गुणधर्म दर्शवतो. म्हणून मिलेट खरेदी करताना वेगवेगळे रंग असलेले अथवा नुसती वरची साल काढलेले (ल्हज्दत्ग्sप्) मिलेटच खरेदी करावे. मिलेट धुताना रंग जाणे नैसर्गिक आहे. त्यामुळे दोनपेक्षा जास्त वेळा मिलेट धुऊ नये. मिलेट्स नेहमी वेगवेगळी खावीत, एकत्र करून खाऊ नयेत. वय वर्षे 5 ते वय वर्षे 100 पर्यंत कुणीही व्यक्ती मिलेट खाऊ शकतात. एका दिवशी शक्यतो एक मिलेट वापरावे. डाळींच्या बरोबर मिलेट्स मिक्स करून चालतील, पण इतर धान्यांच्या बरोबर नको.
कमी पाण्यावर, खडकाळ जमिनीतसुद्धा अगदी उत्तम पद्धतीने घेता येणारी ही धान्ये शेतकऱ्यांसाठीसुद्धा आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायद्याची आहेत. यांच्या या बहुगुणी उपयोगामुळेच त्यांना देवधान्ये हे नाव पडले असावे. थोडक्यात काय तर ही अशी मिलेट्स म्हणजेच देवधान्ये फार पूर्वीपासून आपल्याकडे घेतली जातात. जी जमिनीचं, आपलं आणि एकूण पर्यावरणाचं आरोग्य चांगलं ठेवतात. आता तुम्हीही त्यांचा समावेश तुमच्या आहारात करायला लागा. मस्त खा आणि स्वस्थ रहा.
(लेखिका अनुवादक व समता या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)



























































