
सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा मराठी रिमेक करण्याचे फॅड चालू आहे. आता हा ट्रेंड आणखी एक पाऊल पुढे गेला असून आता पंजाबी चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे. रनिंग हॉर्सेस फिल्म्स आणि ग्लोबल टायटन्स प्रस्तुत ‘वाळू माफिया’ हा चित्रपट मराठीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याव्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे. सिमरनजीत सिंग हुंदल लिखित, दिग्दर्शित ‘वाळू माफिया’ येत्या 28 एप्रिल रोजी तिन्ही भाषांत चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून यात सिंगा, रांझा विक्रम सिंग, सारा गुरपाल, स्वीताज ब्रार, प्रदीप रावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट वाळू माफियांवर आधारित आहे, याची कल्पना येते.
ऍक्शन आणि ड्रामाने भरलेल्या या चित्रपटाचे उदय सिंग, विक्रम सिंग, शिरीन मोरानी सिंग निर्माते आहेत. या प्राडक्शन हाऊसचा हा पहिला मराठी डब चित्रपट असला तरीही भविष्यात मराठी चित्रपटांची निर्मिती करण्याची इच्छा उदय सिंग यांनी व्यक्त केली.


























































