
देशात रेल्वेची धडधड सुरू झाली त्याला उद्या तब्बल 170 वर्षे पूर्ण होणार आहेत. म्हणजे आपली रेल्वे तब्बल पावणे दोनशे वर्षांची झाली असली तरी मुंबईकरांची लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी सुरू असलेली धावाधाव आजही सुरूच आहे. सहा डब्यांची लोकल नऊ डब्यांची झाली, आता पंधरा डब्यांची झाली असली तरी चाकरमान्यांना लटकतच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो प्रवाशांचा बळी जात आहे. हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
स्वातंत्र्यापूर्वी 16 एप्रिल 1853 रोजी ब्रिटिशांनी बोरीबंदर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)-ठाणेदरम्यान रेल्वे चालवली होती. त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत गेली असून स्वातंत्र्यानंतर रेल्वेचे जाळे देशभरात पसरले आहे. आधी कोळशावर धावणारी रेल्वे आता विजेवर धावू लागली आहे. सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत ट्रेनही धावू लागली असली तरी मुंबईकरांची लोकल पकडण्यासाठी सुरू असलेली धावाधाव आणि लटकंती वर्षानुवर्षे सुरूच आहे. त्यामुळे रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोना महामारीच्या आधी 2014 मध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 3423 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 2015 मध्ये 3304 तर 2016 मध्ये 3202 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांच्या रेल्वे प्रवासावर मर्यादा होत्या. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण घटले होते, मात्र आता पुन्हा रेल्वेच्या हद्दीतील मृत्यूचा आकडा वाढला असून 2022 मध्ये 2507 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 2155 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
आता एसी लोकलने गर्दीत भर
मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेकडून सध्या प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी एसी लोकल चालवल्या जात आहेत, मात्र याच एसी लोकलमुळे रेल्वे स्थानकातील गर्दीत मोठी भर पडत आहे. एक लोकल रद्द झाली किंवा विलंब झाला तर रेल्वे फलाटावर प्रवाशांना उभे राहायलाही जागा नसते. त्यातच एसी लोकल आल्यानंतर पुढील दोन-तीन गाडय़ांना गर्दी होते. कारण एसी लोकलने प्रवास करणाऱयांची संख्या नगण्य आहे. त्यामुळेच सर्वसामान्य प्रवाशांकडून एसी लोकलला विरोध होत आहे.
रेल्वे नुसतीच 170 वर्षांची झाली आहे. प्रशासनाकडे दूरदृष्टी नसल्याने उपनगरीय लोकलवासीयांच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. अनेक प्रकल्प केवळ कागदावरच आहेत. त्यामुळेच मुंबईकरांना लटकत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
> नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
वर्ष रेल्वे प्रवाशांचा मृत्यू जखमी
2014 3423 3299
2015 3304 3349
2016 3202 3312
2017 3016 3345
2018 1901 –
2019 – 2600
2022 2507 2155

























































