
लोनच्या नावाखाली ग्राफिक डिझायनरची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला कुरार पोलिसांनी अटक केली. लियाकत अली शौकत अली असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार हे ग्राफिक डिझायनर असून ते मालाड परिसरात राहतात. गेल्या वर्षी तक्रारदार यांना पैशाची गरज होती. तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर लोन अप्सची जाहिरात पाहिली. ती जाहिरात पाहिल्यानंतर तक्रारदार यांनी एका नंबरवर फोन केला. ठगाने त्यांना लोन मंजूर करून देतो, असे सांगून एक अप्स डाऊनलोड करायला सांगितले. पैशाची गरज असल्याने त्यांनी ते अप्स डाऊनलोड करून त्यात त्यांची वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती भरली.
माहिती भरल्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे काढले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक सतीश गाढवे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मनोज चाळके, उप निरीक्षक सुजित म्हैसधुणे आदी पथकाने तपास सुरू केला. फसवणुकीचे पैसे ज्या खात्यात जमा झाले होते, त्या खात्याची माहिती काढली. त्यावरून पोलीस दिल्लीला गेले. दिल्ली येथून पोलिसांनी लियाकत अलीला ताब्यात घेतले.





























































