
>> ज. मो. अभ्यंकर
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणः 2020 हे अमलात आणण्याचा निर्णय झाला असला तरी त्यासाठी लागणारा कृती कार्यक्रम अद्याप तयारच करण्यात आलेला नाही. याआधी 1968 आणि 1986 च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा कृती कार्यक्रम तातडीने अमलात आणता आला होता. 2020 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मात्र मागील धोरणांच्या तुलनेत तूर्त तरी मृगजळ ठरले आहे. कार्यवाहीसाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती क्षीण असल्यामुळेच हे घडत आहे.
स्वातंत्र्योत्तर कालखंडातील तिसरे शैक्षणिक धोरण हे डॉ. कस्तुरिरंगन यांच्यासारख्या श्रेष्ठ वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली 2020मध्ये आकाराला आले. 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर केवळ 18 वर्षांनंतर अर्थात 1986 मध्ये सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आले होते. 2020 चे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मात्र तब्बल 34 वर्षांच्या खंडानंतर अमलात आणण्याचा निर्णय झाला. अर्थात आता 3 वर्षे संपल्यानंतरही हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणण्याचा कृती कार्यक्रम अजून तयार झालेला नाही. 1968 आणि 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही तातडीने त्या-त्या वर्षी सुरू झाली होती. निश्चित स्वरूपाचा कृती आराखडा आणि आवश्यक ती आर्थिक तरतूद उपलब्ध झाली होती. दिशा स्पष्ट होती आणि साधनांची उपलब्धता करून देण्यात आली होती. पुरेसे मनुष्यबळ व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन धोरणाच्या कार्यवाहीसाठी सज्ज ठेवल्यामुळेच 1986 च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा कृती कार्यक्रम तातडीने अमलात आणता आला होता. 2020 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मात्र मागील धोरणांच्या तुलनेत तूर्त तरी मृगजळ ठरले आहे. कार्यवाहीसाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती क्षीण असल्यामुळेच हे घडत आहे.
पायाभूत शिक्षण व्यवस्थेत (Foundational) शिशू वर्ग 1 ते 3 आणि इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. ही व्यवस्था अंगणवाडीच्या इमारतीमध्ये करण्यात येईल की, अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा संकुलामध्ये केली जाईल? सध्याच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेमध्ये केला जाईल की, स्वतंत्रपणे पूर्व प्राथमिक शाळेमध्ये करण्याबाबत धोरणात दिलेला विकल्प विचारात घेतला जाईल? अंगणवाडीमध्ये पायाभूत शिक्षणाची व्यवस्था करायची असल्यास राज्यातील 1,20,000 अंगणवाडय़ांना 3 अतिरिक्त वर्ग खोल्या बांधून द्याव्या लागतील. त्यातही भाडय़ाच्या खोलीत चालविल्या जाणाऱ्या 38 हजार अंगणवाडय़ांना प्रत्येकी 4 खोल्या बांधून द्याव्या लागतील. पूर्व प्राथमिक स्तरावरील सर्वच बालकांना शाळा प्रविष्ट करावे लागणार असल्यामुळे वर्ग खोल्यांची उपलब्धता लवकर करून द्यावी लागेल. अर्थात अशा किमान 3 लाख 60 हजार वर्ग खोल्या बांधण्यासाठी सध्याच्या शासकीय दराप्रमाणे किमान 60 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. त्या दृष्टीने कोणतेही लघुकालीन अथवा दीर्घकालीन नियोजन शासनाने केल्याचे दिसून येत नाही. यापूर्वीच नियोजन केले असते तर 90टक्के केंद्राचा निधी उपलब्ध असलेल्या ‘मनरेगा’ योजनेतून अंगणवाडय़ांच्या विस्तारीत वर्ग खोल्यांचा कार्यक्रम सुरू होऊ शकला असता. केरळात मनरेगा योजनेतून 11 हजार कोटी रुपयांची अंगणवाडय़ांची बांधकामे आणि शाळा दुरुस्तीसह इतर कामे सुरू करण्यात आली आहेत. तेलंगना राज्यानेसुद्धा 9 हजार कोटी रुपयांची कामे ‘मनरेगा’च्या निधीतून करून घेतली. महाराष्ट्रात मात्र 2022-23 चा मनरेगावरील एकूण खर्च 3600 कोटी रुपयांवर जाऊ शकला नाही. त्यात केबळ 100-150 अंगणवाडय़ांच्या बांधकामाचा अंतर्भाव असल्याचे समजते.
पायाभूत शिक्षणाच्या स्तरावर अंगणवाडी शिक्षिकेला (बारावी उत्तीर्ण असल्यास) 6 महिन्यांचा ईसीसीई प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असून कमी शिक्षणाच्या अंगणवाडी शिक्षिकेस एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे 2020 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आवश्यक आहे. एकतर पूर्व प्राथमिकच्या तीन वर्गाच्या अध्ययन-अध्यापनासाठी किमान दोन प्रशिक्षित शिक्षिकेची नियुक्ती करावी लागेल. अशाप्रकारे प्रत्येक अंगणवाडीकरिता लागणाऱ्या अतिरिक्त शिक्षिकेच्या नियुक्तीबाबत राज्य शासनाने धोरण ठरविल्याचे ऐकिवात नाही. अतिरिक्त पदांची निर्मिती केली जाईल की सध्या कार्यरत असलेल्या अप्रशिक्षित अंगणवाडी ताईकडेच सध्याच्या जबाबदारीव्यतिरिक्त तिन्ही वर्गांच्या अध्यापनाचे कार्य लादले जाईल, याबद्दल कोणताही खुलासा शासनातर्फे करण्यात आलेला नाही. याशिवाय पायाभूत शिक्षणातील इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग अंगणवाडीत आणणार की सध्या प्राथमिक शाळेत भरणार, हे वर्ग प्राथमिक शाळेतच ठेवून शिक्षणाची दोन केंद्रे उभी करून धोरणाच्या उद्दिष्टालाच नख लावणार?
पायाभूत शिक्षण (शिशू वर्ग ते दुसरी) पूर्वतयारी वर्ग (Preparatory) (इयत्ता तिसरी ते पाचवी), पूर्व माध्यमिक (इयत्ता सहावी ते आठवी) व माध्यमिक (इयत्ता नववी ते बारावी) या सर्व स्तरावरील सर्व रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात येतील असे धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे. त्याबाबतचा समयबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल अशीही पुष्टी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जोडली गेली आहे. याबाबत सध्यातरी कोणतेही नियोजन दिसून येत नाही.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अभिप्रेत असलेल्या पुढील तरतुदीबाबत कोणताही खुलासा न करता राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी 2023-2024 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली. कोणतीही पूर्वतयारी नसताना आणि विशेषतः धोरणाच्या अंमलबजावणीचा कृती कार्यक्रम तयार नसताना अंमलबजावणीची झालेली घोषणा चमत्कारिक वाटते. कदाचित येत्या दीड महिन्याच्या कालावधीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास सुसंगत ठरणारे काही निर्णय घेण्याचा शासनाने निर्धार केला असावा, असे शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेवरून वाटते. नवीन अतिरिक्त पदांच्या निर्मितीसह शिक्षकांअभावी शिक्षणाची होत असलेली दुरवस्था दूर करण्यासाठी रिक्त जागा भरण्यास शासन परवानगी देईल आणि येत्या दीड महिन्यात सर्व रिक्त पदे भरण्यात येतील, याची शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे खात्री वाटते. उत्कृष्ट पोषण आहार बालकांना मिळावा यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकघराची उभारणी या दीड महिन्यात होईल असेही वाटते. गळती होणाऱ्या बालकांसाठी इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी तसेच दहावी व बारावी स्तरावर दुरंतर शिक्षण व्यवस्थाही ते निश्चितच निर्माण करतील.
अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल आणि निर्दोष अद्यापन पद्धतीचे समस्त 7 लाखांहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण याबाबतची कार्यवाहीसुद्धा पुढील दीड महिन्यात पूर्ण होईल. मातृभाषेतून इयत्ता पाचवी व त्यानंतर इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण देण्याबाबत कडक आदेश काढण्यात येतील आणि यापुढे इंग्रजी माध्यमाच्या नवीन प्राथमिक शाळांना परवानगी न देण्याचा निर्णय प्रत्यक्ष अमलात आणला जाईल, इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग असलेल्या शाळांमध्ये व्यवसाय शिक्षणाचे किमान चार अभ्यासक्रम सुरू केले जातील. त्यास आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा राज्य शासन पुढील दीड महिन्यात जादुई वेगाने निर्माण करील अशीही खात्री सरकारच्या घोषणेमुळे वाटते. याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या स्तरावरील परीक्षा एका आदेशाने मार्च 2024 पासून घेणे बंद केला जाईल आणि क्षमताधिष्ठत प्रमाणपत्रे शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातून प्राप्त करण्याचे आदेशही काढण्यात येतील, याविषयी शंका घेण्याचे कारण दिसत नाही!
(लेखक महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आहेत)

























































