
>> शिरीष कणेकर
मी दीपक पराशर असतो तर मी कोण आहे हे मी रस्त्यात ज्याला तिला विचारलं असतं. मी विजय मल्ल्या असतो तर नाव न बदलता केवळ नावाच्या स्पेलिंगमध्ये किरकोळ बदल करून मल्ल म्हणून देशात परतलो असतो.
मी नवज्योतसिंग सिद्धू असतो तर क्रिकेटपेक्षा आपल्याला हसण्याचा व्यवसाय जास्त चांगला जमतो हे ओळखून खळखळून हसलो असतो.
मी अजय-अतुल ही संगीतकारांची जोडी असतो तर ती शंकर-जयकिशन, हुस्नलाल-भगतराम, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, नदीम-श्रावण, जतिन-ललित, आनंद-मिलिंद, सचिन-जिगर, विशाल-शेखर, सलीम-सुलेमान, साजिद-वाजिद, शिव-हरी, बिपिन-बाबुल यांच्यात मी कुठे बसतो ते न कळून मी नुसताच बसून राहिलो असतो.
मी बाबू टांगेवाला असतो तर पाकिस्तानी क्रिकेट कॉमेंटेटर्सना टांग्याला जुंपलं असतं व ते दृश्य बघायला लांबून लांबून घोडे आले असते. त्यांनी कॉमेंटरी केली असती.
मी मोरारजी देसाई असतो तर घरातील भलामोठा (सगळं मंत्रिमंडळ बसेल एवढा) शिसवी पलंग विकून त्या पैशातून तीन छोटे आटोपशीर पलंग आणले असते. त्यातील एकावर अंगाची मुटकुळी करून मनमोहन कृष्ण पहुडले असते. हा विनोद समजून मोरारजीभाई हसले असते व मोरारजीभाईंना हसलेले पहाणारे मनमोहनजी जगातले एकटेच ठरले असते.
मी अमीन सयानी असतो तर ‘भाईयों और बहेनों’ अशी बुधवारच्या ‘बिना का गीतमाला’ची सुरुवात न करता त्या ऐवजी आजच्या घडीला ‘बों और बीयों’ अशी सुरुवात केली असती.
मी वैभव मांगले असतो तर माझं तुळतुळीत टक्कल नैसर्गिक आहे की मी डोकं वस्तऱ्यानं भादरलंय हे लोकांना सोडा मला स्वत:लाही कळू दिलं नसतं.
मी धावपटू मिल्कासिंग असतो तर मी कुठून कुठेही धावतच गेलो असतो. पतियालाहून मुंबईला, दिवाणखान्यातून बाथरूममध्ये, सासूकडून सासऱ्याकडे व बायकोकडून फुटेल त्या दिशेला.
मी डॉ. मृणाल दाढे-जोशी असतो तर मी चुकूनही लता मंगेशकरच्या वाटय़ाला गेलो नसतो व अलका याज्ञिक, सुलक्षणा पंडित, कविता कृष्णमूर्ती, सुनीधी चौहान, साधना सरगम, नेहा कक्कर, मोनाली ठाकूर, जसपिंदर नरुला, उषा डथुप, सुषमा श्रेष्ठा, फाल्गुनी पाठक, अलिशा चिनाय, सोनू कक्कर, अनुष्का मनचंदा, हेमलता, शारदा, इला अरुण, रेखा भारद्वाज, बेला शेंडे, वाणी जयराम, शुभा मुदगल, सोनल मानसिंग, आरती अंकलेकर-टीकेकर, कमल बारोट यांची गाणी मूळ गाण्यांपेक्षा चांगली गायली असती.
मी कुस्तीपटू गामा असतो तर विविध राजकीय पक्षांनी मला आपल्याकडे ओढले असते. मात्र अंगात कपडे घालून कुस्ती खेळण्याचा मला सराव करावा लागला असता.
मी शरद उपाध्ये असतो तर मी बोलण्याचे पैसे तर घेतलेच असते पण त्याहून जास्त पैसे थांबण्याचे घेतले असते. तेव्हा बायको सतत पण फुकट बोलते याची किंमत मला कळली असती.
मी पिंजऱ्यातलं माकड असतो तर बाहेर मोकळी फिरणारी दोन पायांची कपडय़ातील माकडं पाहून मी मनाचं मनोरंजन केलं असतं.
मी नर्तक गोपीकृष्ण असतो तर बायकोच्या तालावर नाचणारा असं माझ्याविषयी कोणी बोलू शकलं नसतं. अशीच इच्छा असणारे माझा क्लास लावीत.
मी टाइपरायटर असतो तर केवळ तरुण पोरींकडून थापटून घेतलं असतं. दुसरं कोणी आल्यास मीच माझ्या ‘कीज’ जाम केल्या असत्या.
मी सुमन कल्याणपूर व अनुराधा पौडवाल असतो तर प्रतिलता म्हणवून घेण्यावर न थांबता थेट लताच झालो असतो पण ते शक्य नाही हे मला कळल्यावर मी गुपचूप गात राहिलो असतो. थोडक्यात त्यांनी केलं तेच केलं असतं.
मी कातडी तज्ञ (स्किन स्पेशालिस्ट) डॉ. डी. जी. सापळे असतो तर कातडी वाचवण्याचे विविध मार्ग शिकवण्याची गावोगावी शिबिरं घेतली असती व तिथून कातडी बचावून पलायन केलं असतं.
मी दिलीप प्रभावळकर असतो तर हयात मुंबईत काढून पुण्याला गेल्यावर मी म्हणालो असतो,- ‘मुंबईहून पुण्याला गेल्यावर तपमान कमी होतं व अपमान वाढतो.’
मी दिलीपकुमार असतो तर निश्चितच मधुबालाशी लग्न केलं असतं. त्यामुळे आमचंच मधुबालाशी लग्न झालंय असं आम्ही मानून घेतलं असतं. तरी मीनाकुमारी राहिलीच.
मी शिरीष कणेकर असतो तर भिंतीला तुमडय़ा लावत बसलो असतो. रिकामे न्हावी तेच करतात ना?































































