
>> संजीव प्र. कुसूरकर
‘अजि मी ब्रह्म पाहिले’… आशा भोसले यांचा स्वर आणि श्रीनिवास खळे यांचे संगीत असलेली भक्ती रचना आपणा सर्वांच्या परिचयाची आहे, पण याचे रचनाकार संतकवी अमृतराय यांच्या जीवनाविषयी फारशी माहिती आपणापैकी बऱयाच जणांना नाही. त्यांच्या चरित्रावर आधारित ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. अमृतराय संस्थान, पैठणचे संस्थानाधिपती श्री प्रफुल्लबुवा तळेगावकर यांच्या प्रयत्नाने हा ग्रंथ साकारला आहे.
अमृतराय मूळचे बुलढाणा जिह्यातील साखरखेर्डाचे. तेथे अमृतेश्वर मंदिर आहे. आईवडिलांनी केलेल्या नवसाने मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव अमृतराय ठेवले गेले. त्यांना रायजी असेही म्हटले जात असे. रायजींच्या पत्नीचे नाव रमा. लग्न झाल्यावर अचानक आईवडिलांचे निधन झाले. त्यामुळे रायजी साखरखेर्डा सोडून सासूरवाडीस संभाजीनगरला वास्तव्यास आले.
प्रखर बुद्धिमत्ता, चातुर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व यामुळे रायजींना मोठय़ा हुद्दय़ाची नोकरी मिळाली. पाचशे सैन्याचे पथक, घोडेस्वार असा लवाजमा होता. लहानपणापासून अमृतराय यांना कीर्तनाची आणि काव्यरचना करण्याची आवड होती. अतिशय राजबिंडे रूप तसेच उच्च सांपत्तिक स्थिती त्यांना प्राप्त होती. दिवसभर काम करून ते रोज रात्री कीर्तन करीत असत. त्यांना मध्व मुनिश्वर हे गुरू म्हणून लाभले होते.
एके दिवशी एक महंत त्यांचे ‘वैराग्य भाग्यासारिखे आणिक भाग्य नाही’ हे पद ऐकून त्यांच्या भेटीस आले होते, तर अमृतराय गळ्यात पंचरत्नांचे हार, भरजरी पगडी आणि हिरेजडीत सिंहासनावर बसले होते. त्या व्यक्तीने ‘‘तुम्ही संपत्तीचे भोग घेता आणि रात्री कीर्तनात वैराग्यावर बोलता हे विपर्यस्त वाटते. तुम्ही आत्ताच आमच्या सोबत बाहेर पडा’’ असे म्हणून त्यांना जंगलात घेऊन गेले. त्याच वेळी त्यांचा एक श्रीमंत भक्त अमृतराय यांना भेटण्यास जंगलात आला. ‘‘तुम्हाला येथे कोणी ठेवले आहे?’’ अशी विचारणा केली. अमृतराय यांनी तेथून परतण्यास नकार दिला. त्या भक्ताने तेथे भव्य शामियाना उभा करून गतवैभव स्थापन केले. ज्या महंतांनी त्यांना पकडून जंगलात ठेवले होते, त्यांना हा दिमाख पाहून आश्चर्य वाटले आणि रायजींची थोरवी त्यांना समजली. अमृतराय महाराजांनी सांगितले की, संपत्ती आणि वैराग्य हे माझ्या जीवनात बरोबरीने चालतात. ‘जया निजेलियाते उपासी वैराग्य गा’ हीच अवस्था रायजी महाराजांची होती.
कटावठ हा नवा काव्यरचना प्रकार संत अमृतराय यांनी आणला. जोगवा, गझल, चूर्णिका, आख्याने अशा काव्य प्रकारातील विविध स्वरचना ते कीर्तन निरूपणात घेत श्रोत्यांना उद्बोधन करीत असत. अनेक ठिकाणी त्यांची कीर्तने होत. त्यात निजाम दरबार आणि पेशवे दरबारात त्यांची कीर्तने झाल्याचा उल्लेख आहे. त्यांची शिष्यपरंपरा त्याच ताकदीने आध्यात्मिक व्रत पुढे नेत राहिली. अमृतराय घराण्याचे वंशज प्रफुल्लबुवा तळेगावकर यांनी हे चरित्र प्रकाशित करून भाविकांवर मोठे उपकार केले आहेत.
पैठण येथे राममंदिराची स्थापना करून संत अमृतराय यांनी चैत्र शु. प्रतिपदा ते चैत्र पौर्णिमा असा पंधरा दिवसांचा उत्सव सुरू केला. ती परंपरा आजही सुरू आहे. चैत्र शु. षष्ठाr तिथीस रायजींच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अवघे पंचावन्न वर्षे आयुष्य लाभलेल्या रायजींनी चैत्र शु. षष्ठी इ. स. 1744 ला गोदावरीच्या तीर्थात जलसमाधी घेतली. समाधी दिनी तेथे दीपोत्सव होतो.
डॉ. अश्विनी (मीराताई) जोग, सोलापूर यांनी मध्वमुनीश्वर आणि अमृतराय या गुरुशिष्यांच्या साहित्यावर पीएचडी केली आहे. अनेक अभ्यासकांनी संत अमृतराय यांच्यावर ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत.
‘अजि मी ब्रह्म पाहिले’ या अभंग रचनेत संत अमृतराय यांनी भगवान पंढरीनाथांचे वर्णन केले आहे आणि संत एकनाथ, चोखा मेळा, जनाबाई, दामाजीपंत या संतमहात्म्यांची कीर्ती वर्णन केली आहे. रायजींचे अनेक अभंग जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे, कीर्ती शिलेदार या प्रसिद्ध गायकांनी स्वरबद्ध केले आहेत.
ऐश्वर्यसंपन्न तितकेच वैराग्यशील संतकवी अमृतराय यांच्या 325 व्या जयंती पर्वणीवर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या चरित्राचा लाभ सर्व भाविक घेतील ही खात्री आहे.






























































