वीटभट्टय़ांसाठी कृष्णाकाठ खोदण्याचा सपाटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिचभर परवान्याच्या आधारे वीटभट्टय़ांसाठी कृष्णाकाठी बेकायदा मातीउपसा सुरू आहे. सांगलीवाडी, अंकली, पद्माळे, नांद्रे परिसरात या वीटभट्टय़ांच्या रूपाने कृष्णाकाठ खोदण्याचा सपाटाच सुरू असून, यामुळे महापुराचा धोका वाढणार आहे. कोटय़वधी रुपयांच्या महसूल बुडवेगिरीचा कारभार बिनबोभाट सुरू असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे याविरोधात आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगलीवाडी व अंकलीत अंदाजित 12 कोटी विटांचे उत्पादन होते. 217 वीटभट्टय़ा असून, प्रत्येकाकडे 5 ते 10 लाखांपर्यंत विटांचा साठा आणि विक्री झालेल्या मालाचे मोजमाप नाही. काहीजणांकडे फक्त 500 ब्रास विक्रीचा परवाना आहे. 80 टक्के वीटभट्टीधारक हे अवैध, विनापरवाना व्यवसाय करणारे आहेत. एका ब्रासमधून 2500 ते 2800 विटा तयार होतात. म्हणजे 5 ब्रासमधून अंदाजित एक लाख विटांचे उत्पादन होते. मग साठा केवळ 5 ते 10 लाखांचा कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. वार्षिक 50 लाख ते 1 कोटीपर्यंत उत्पादन कसे, 8 रुपये दराने 8 कोटी उत्पादन घेणारे वीटभट्टीधारक शासनाला किती महसूल देतात. प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कृष्णाकाठ ओसाड होत असताना महसूलच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, अशी मागणी पटेल यांनी केली आहे.

सध्या प्रत्येक वीटभट्टीधारकांनी डोंगराएवढे मातीचे ढीग उपसा केले आहेत. या संपूर्ण प्रकाराकडे प्रशासन जाणूनबुजून डोळेझाक करीत आहे, असा आरोप पटेल यांनी केला आहे. पुढील वर्षी माती उपशावर बंदी येणार आहे, अशी चर्चा असल्यामुळे प्रत्येक वीटभट्टीधारक बेसुमार माती उपसा करीत आहेत. शेतमालकालाही मोठी रक्कम मिळत आहे. प्रशासन, वीटभट्टीचालक यांचे हातात हात घालून काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.