राजौरी चकमक: दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद, ‘ऑपरेशन त्रिनेत्र’ दरम्यानची घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indian-army-jawan-in-jk
जम्मू-कश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत पाच जवान शहीद झाले आहेत. हिंदुस्थानी लष्कराने शुक्रवारी (5 मे) रोजी यासंदर्भातील माहिती दिली आहे. लष्करानं दिलेल्या माहितीनुसार राजौरी सेक्टरमध्ये सुरू असलेल्या ‘ऑपरेशन त्रिनेत्र’मध्ये गंभीर जखमी झालेल्या तीन जवानांचा सकाळी दुर्दैवाने मृत्यू झाला. पहाटे दोन जवान शहीद झाले. ऑपरेशन अजूनही सुरू आहे. डीजीपी दिलबाग सिंग घटनास्थळी हजर आहेत.
लष्कराच्या उत्तरी कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्यात जम्मू भागातील भाटा धुरियानच्या टोटा गली भागात लष्कराच्या ट्रकवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाचा खात्मा करण्यासाठी त्यांचे सैन्य सतत गुप्तचरांवर आधारित ऑपरेशन करत होते. राजौरी सेक्टरमधील कांडी जंगलात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारे 3 मे रोजी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली होती, असे निवेदनात म्हटले आहे.
दहशतवाद्यांशी चकमक
शुक्रवारी सकाळी 7.30 च्या सुमारास सर्च पार्टीने एका गुहेत लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाला घेरले. आजूबाजूला खडक आणि उंच पर्वतीय भागांनी वेढलेला हा परिसर अतिशय घनदाट वनक्षेत्र आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांनी स्फोट केला. सैन्य दलातील दोन जवान शहीद झाले असून एका अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले आहेत. जखमींना उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.