
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी अरमान खत्रीला शनिवारी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. अरमानसुद्धा आयआयटीचा विद्यार्थी असून त्याने दर्शनला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. तथापि, प्रथमदर्शनी अरमानविरुद्ध अॅट्रॉसिटीचा आरोप सिद्ध करणारे पुरावे दिसत नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले आणि अरमानला 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडून देण्याचे आदेश दिले.
खत्री सध्या न्यायालयीन कोठडीत होता. दर्शन सोलंकीने सत्र परीक्षा संपल्यानंतर दुसऱयाच दिवशी 12 फेब्रुवारीला आयआयटी कॅम्पसमधील वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. त्यात दर्शनचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन आठवडय़ांनी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) सोलंकीच्या खोलीत चिठ्ठी सापडली होती. ‘अरमानने मला मारले आहे’, असे त्या चिठ्ठीत लिहिले होते. त्याआधारे 9 एप्रिलला क्राईम ब्रँचच्या एसआयटीने अरमानला अटक केली होती.



























































