
भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे आणि उमा पानसरे यांच्यावरील गोळीबारानंतर ऍस्टर आधार रुग्णालयातील विविध ‘एक्स-रे’सह अन्य वैद्यकीय कागदपत्रे ओळखणारा पंच सय्यद पटेल याने दिलेली साक्ष, प्रत्यक्षात असणारा पंचनामा अन् प्रत्यक्ष असलेली वस्तुस्थिती यातील विसंगती संशयित आरोपींचे वकील ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ऍड. समीर पटवर्धन यांनी आज उलट तपासणीत न्यायालयात उघड केला.
कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर सुरू आहे. याप्रकरणी बेळगाव येथील ऍड. प्रवीण करोशी, इचलकरंजी येथील ऍड. डी. एम. लटके आणि ऍड. ए. जी. बडवे यांनीही उलट तपासणी घेतली. या खटल्यात एकूण 12 संशयित आरोपी आहेत. पुढील सुनावणी 20 मे रोजी होणार आहे.
‘राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोरून जाताना पोलिसांनी मला बोलावले आणि मी नोंदवलेला जबाब वाचून स्वाक्षरी केली आहे. माझ्यासमोर जबाबाची प्रत काढली,’ असे पंच पटेल यांनी न्यायालयात साक्ष देताना सांगितले होते. प्रत्यक्षात उलटतपासणीत ऍड. पटवर्धन यांनी पंच पटेल यांची आज साक्ष देताना ते अशासकीय ठेकेदार असल्याचे सांगितले आहे, तर प्रत्यक्षात पोलिसांकडून सादर केलेल्या लेखी पंचनाम्यात ते शासकीय ठेकेदार असल्याचे लिहिले आहे. पंच पटेल यांनी त्यांच्या मुद्रित जबाबात खाडाखोड नाही, असे न्यायालयात सांगितले, तर प्रत्यक्षात मुद्रित जबाबात खाडाखोड असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच कॉ. पानसरे यांच्यासंदर्भातील रुग्णालयातील एक्स-रे फिल्मवर एक होल दिसत आहे. त्यावर मार्कर पेनने गोल केले असून, दुसऱया ठिकाणी लिहिले आहे. मात्र, पटेल यांच्या पंचनाम्यात त्याचा उल्लेख नसल्याचे ऍड. पटवर्धन यांनी उलट तपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पंच पटेल हे कॉ. पानसरे यांच्या वैद्यकीय अहवालात 80 पाने असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात त्या पानावर क्रमांक होते का, याविषयी ते सांगू शकत नाहीत. काही पानावर क्रमांक आहेत, तर काही पानांवर क्रमांक नाहीत. पटेल यांनी हातात पाने घेऊन मोजलेली नव्हती; तसेच पोलिसांनी दाखविलेले एक्स-रे, छायांकित प्रती आणि आजच्या दिवशी न्यायालयात दाखविलेले ‘एक्स-रे’, तसेच छायांकित प्रती, त्याच आहेत, हेही सांगू शकत नाही. त्यामुळेच त्यांच्या जबाबात विसंगती असल्याचे उघड केले.




























































