
>> मनमोहन रो. रोगे
देशात असे आठ प्रकल्प आहेत, ज्यांचा समुद्राशी दुरान्वये संबंध नाही. मग याच प्रकल्पासाठी कोकणची निवड कशासाठी? महाराष्ट्राच्या बाजूच्या गोवा आणि केरळ या दोन राज्यांचा आर्थिक डोलारा पर्यटनावर अवलंबून आहे. मग आपले कोकण निसर्गसौंदर्यांने समृद्ध, परिपूर्ण असताना त्याचा उपयोग राज्याच्या महसूल वाढीसाठी व स्थानिकांना उद्योगधंद्यासाठी करून न घेता निसर्गाने दिलेल्या अनमोल संपत्तीची राखरांगोळी करण्याचा करंटेपणा आपण का करू पाहतोय, याचा विचार प्रत्येक नागरिकाने करून कोकणात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द करायला लावला पाहिजे.
कोकणात रिफायनरी प्रकल्प व्हावा की होऊ नये यावर मागील अनेक वर्षे वादविवाद, मतमतांतरे सुरू आहेत. सध्या तर बारसू येथील रिफायनरीवरून वातावरण कमालीचे तापलेले आहे. प्रकल्पाचे समर्थक आणि विरोधक एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेत. आपापल्या विरोधकांना आव्हाने – प्रतिआव्हाने दिली जाताहेत. रिफायनरीतील तज्ञ, अभ्यासक आणि ऐकीव माहिती असणारेही कोकणात रिफायनरी असावी की असू नये, यावर प्रसिद्धी माध्यमांवर आपापली मते मांडताहेत आणि ते सारे वाचून / ऐकून सर्वसामान्य कोकणी माणसांना आणि कोकणावर प्रेम करणाऱ्यांना काही प्रश्न पडलेत. त्या प्रश्नांची उत्तरे रिफायनरी समर्थकांनी द्यायला हवीत.
रिफायनरी समर्थक साधारणपणे पुढील बाबी सांगतात –
असे चार रासायनिक प्रकल्प गुजरातमध्ये आहेत, पण त्यामुळे गुजरातचे कसल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही, गुजरात संपन्न आहे. गुजरातमधील जामनगर भागात प्रकल्पाशेजारीच कित्येक एकरात असलेल्या आंबा बागायतीच्या आंब्यांची जगभर निर्यात केली जाते. मासेमारीतही गुजरात एक नंबर आहे.
या प्रकल्पात अत्याधुनिक साधनसामग्री वापरणार असल्याने कोकणातील निसर्गसौंदर्य आणि शेती – मच्छीमारीवर कसलाच परिणाम होणार नाही.
या प्रकल्पामुळे साधारण एक लाख लोकांना रोजगार मिळेल. कोकणचा विकास होऊन राज्याचा आर्थिक फायदा होईल. आता या समर्थकांच्या म्हणण्यानुसार विचार केल्यास महाराष्ट्राच्या दुप्पट लांबीचा समुद्रकिनारा गुजरातला लाभलेला आहे, परंतु त्यातील एकही समुद्रकिनारा पर्यटकांच्या पसंतीचा नाही, नव्हे, पर्यटक तिकडे फिरकतच नाहीत. गुजरात सरकारही आपल्या पर्यटन जाहिरातीत गीर अभयारण्य, कच्छचे रण इत्यादीचा वापर करते, पण चुकूनही एखाद्या समुद्रकिनाऱ्याचे नाव घेत नाही. याउलट महाराष्ट्रातील अलिबागपासून सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक समुद्रकिनारा विलोभनीय, रमणीय आहे. त्यातील कित्येक समुद्रकिनारे पर्यटकप्रिय आहेत. ते पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्रकिनाऱ्याला हिंदुस्थानातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्याचा सन्मान लाभला आहे. प्रख्यात क्रिकेटपटू ज्याला क्रिकेटचा देव म्हणतात अशा भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला 50वा वाढदिवस सिंधुदुर्ग जिह्यातील भोगवे सागर किनारी साजरा केला. त्यावेळी त्याने आपण जगभर फिरलो, पण कोकणसारखे निसर्गसौंदर्य कोठेच पाहिले नाही असे सांगितले. ही गोष्ट नजरेआड करण्याजोगी नाही. मग कोकणात रिफायनरी करून या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांची गटारं करायची का? नयनरम्य निसर्गसौंदर्याची राख करायची का? निसर्गाने कोकणला भरभरून दिले आहे. त्याचा उपयोग करून घेण्याऐवजी त्या निसर्गसौंदर्याचा नाश करणे वेडेपणाच नव्हे का? 15-20 हजार वर्षांपूर्वीची कातळशिल्पे रत्नागिरी, सिंधुदुर्गात आढळली आहेत. ही शिल्पे जागतिक वारसा म्हणून नोंद होण्याच्या मार्गावर असताना त्यांना धोका होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला शासन मंजुरीच कशी देऊ शकते ? पालघर जिल्ह्यात पूर्वी चिकूचे पीक 12 टन यायचे, पण तेथे ‘थर्मल पॉवर स्टेशन’ झाल्यापासून ते 2 टनावर आले.
कोकणातील रिफायनरी आंबा, काजू, भातशेतीवर परिणाम करणार नाही असे समजणे वेडेपणाचे होईल. कोकणातील तरुणांच्या रोजगाराची सरकारला इतकीच चिंता वाटते तर राज्यात होऊ घातलेले चार-पाच मोठे प्रकल्प गेल्या आठ-दहा महिन्यांत राज्याबाहेर का जाऊ दिले? त्यातील एखाददुसरा प्रकल्प कोकणात वा राज्यात राखू शकले असते तर बेरोजगारीचा प्रश्न सुटला नसता का? रिफायनरी झाली तर एक लाख लोकांना रोजगार मिळणार ते सर्व कोकणीच असणार का? की त्यासाठी फक्त विनाशकारी प्रकल्पांचीच गरज आहे? ते चार-पाच उद्योग राज्याबाहेर गेले तर हाही जाऊ द्या किंवा निदान निसर्गसंपन्न कोकणऐवजी तो इतर ओसाड ठिकाणी का होऊ शकत नाही? देशात असे आठ प्रकल्प आहेत, ज्यांचा समुद्राशी दुरान्वये संबंध नाही. मग याच प्रकल्पासाठी कोकणची निवड कशासाठी? राज्यातून पहिला प्रकल्प बाहेर गेल्यावर विरोधकांनी रान उठवताच उपमुख्यमंत्र्यांनी ‘एक उद्योग गेला तर त्यापेक्षा मोठा उद्योग राज्यात आणू.’ अशी गर्जना केली होती, त्याचे काय झाले? एक उद्योग आणेपर्यंत आणखी चार उद्योग राज्याबाहेर गेले, त्याला जबाबदार कोण? देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून 26 वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नयनरम्य सिंधुदुर्ग जिह्याची निवड केली. मग त्या जिह्यात / कोकणात अधिकाधिक पर्यटक यावेत यासाठी राज्य सरकारने पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी काय केले? साधा मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 15/20 वर्षांत बनवू शकले नाहीत ना पर्यटक भेटी देतात त्या त्या गावी जाणारे रस्ते वाहने जाण्यायोग्य केले, ना विजेचा लपंडाव संपला. गुजरातचे आंबे जगभर विकले जातात तरी महाराष्ट्रातील गुजराती माणसे किती महाग असले तरी देवगड – रत्नागिरीचे म्हणजेच कोकणचे आंबेच का पसंत करतात? गुजरात इतके प्रगत, संपन्न आहे तर लाखो करोडो गुजराती पोटापाण्यासाठी नोकरी, उद्योगधंदे महाराष्ट्रात का करतात ? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे रिफायनरी समर्थकांनी द्यायला हवीत.
महाराष्ट्राच्या बाजूच्या गोवा आणि केरळ या दोन राज्यांचा आर्थिक डोलारा पर्यटनावर अवलंबून आहे. मग आपले कोकण निसर्गसौंदर्यांने समृद्ध, परिपूर्ण असताना त्याचा उपयोग राज्याच्या महसूल वाढीसाठी व स्थानिकांना उद्योगधंद्यासाठी करून न घेता निसर्गाने दिलेल्या अनमोल संपत्तीची राखरांगोळी करण्याचा करंटेपणा आपण का करू पाहतोय, याचा विचार प्रत्येक नागरिकाने करून कोकणात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द करायला लावला पाहिजे.

























































