विहिरी कोरड्या… बोअरिंग आटल्या… पाण्याचा खडखडाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी दमदार पाऊस होऊनही यंदा वर्षाच्या सुरूवातीलाच पाणीटंचाई भेडसावू लागली असून टंचाईग्रस्त भागात 32 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कोरड्याठाक विहिरी, आटलेल्या बोअरिंग आणि मागणी करूनही मिळत नसलेले टँकर अशी अवस्था सध्या शहापूर तालुक्याची झाली आहे. यंदा पाणीटंचाईने कहर केला असून तालुक्यातील 163 गावपाड्यांच्या घशाला कोरड पडली आहे.

या वर्षी सावरोली, खैरे, शीळ, विठ्ठलगाव, निचितपाडा, साईनगर (बिरवाडी), घरतपाडा, भोईरपाडा, कातकरीवाडी अशा नवीन गावपाड्यांची टंचाईमध्ये भर पडल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. आवाळे, चांदरोटी, कराडे, मामणोली, मसमाळ, बोरीचापाडा, काटेकुई, जांभूळपाडा, शेकटपाडा अशा एकूण 22 गावपाड्यांमध्ये 10 विहिरी व किमान 40 बोअरिंग आहेत. यापैकी सहा विहिरी कोरड्याकाठ पडल्या असून चार विहिरींनी तळ गाठला आहे, तर 40 पैकी शेंडेपाडा व बेरशिंगी येथील अवघ्या चार बोअरिंगलाच पाणी आहे, तर काही बोअरिंग नादुरूस्त आहेत. पंधरा दिवसांपूर्वी टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अजूनपर्यंत टँकर सुरू न झाल्याने सरपंच लहू पाचलकर व उपसरपंच प्रदीप आगिवले यांनी सांगितले.

टँकरची वाट पाहण्यात दिवस जातो

टँकरग्रस्त गावांची संख्या वाढल्याने एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. टँकरची तासनतास वाट पाहावी लागत आहे. गेल्या वर्षी तब्बल 160 गावपाड्यांसाठी 25 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र 163 गावपाड्यांना 32 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून अजून 10 गावपाड्यांसाठी दोन टँकरची मागणी केली आहे.