
>> अनंत बोरसे
देश सध्या अतिशय गंभीर परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. आव्हाने अनेक आहेत. बेरोजगारी, दररोज वाढत जाणारी महागाई, शिक्षण, आरोग्य, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांसाठी जनतेला देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकालातदेखील झगडावे लागते आहे याची कोणाला ना खंत ना खेद! आपण आजही जनतेला या मूलभूत गरजा देऊ शकत नाही, हे आपले अपयश आहे हे कोणीच लक्षात घ्यायला तयार नाही. जो तो एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यग्र आहे. राजकारण, सत्ताकारण करताना भाषेची किमान पातळी राखली जावी याचे भान कोणालाच राहिलेले नाही. याउलट खालची भाषा वापरण्याची, एकमेकांचा अवमान करण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे असे सर्वत्र दिसते आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी निदान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये मतभेद असले तरी टोकाचे मनभेद, व्यक्तिद्वेष तरी नव्हता. मात्र आता टोकाचा व्यक्तिद्वेषच पाहायला मिळतो.
एकमेकांचा मान राखण्याची गरज असताना एकमेकांचा अवमान करण्याची चढाओढच लागली आहे. भावना दुखावणे, अवमान होणे याचा अतिरेकच होऊ लागला आहे. कधी कोणाच्या भावना कशाने दुखावतील, कोणाचा कशाने अवमान होईल आणि कोणत्या गोष्टींचे निमित्त करून वातावरण ताणतणावाचे केले जाईल याला काही धरबंधच राहिलेला नाही. घटनात्मक, महत्त्वाच्या पदांवर बसलेल्यांकडून जनतेला अपेक्षा आहे. मात्र या पदावर बसणारे अनेक जण आपली जबाबदारी, कर्तव्ये, पदाचे भान न राखता बेजबाबदार, बेताल वक्तव्य करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. पदाचा गैरवापर, मर्जीप्रमाणे वापर हे तर आता नित्याचेच झाले आहे. जनतेने आम्हाला निवडून दिले आहे म्हणून आम्ही काहीही बोलू, कसेही वागू ही प्रवृत्ती मोठय़ा प्रमाणावर पह्फावत आहे. न्यायालयाने याबाबत भाष्य केले असले तरीही द्वेषमूलक भाषा करणे काही थांबता थांबेना.
जात, धर्म, प्रांत, ऐतिहासिक महापुरुष, देवीदेवता यांचा आधार घेऊन द्वेषमूलक भाषा वापरून नाहक ताणतणाव निर्माण केला जात आहे आणि हे सर्वांसाठी नुकसानकारक आहे हे कोणीही लक्षात घ्यायला तयार नाही. झाले तेवढे पुरे झाले. निदान यापुढील काळात तरी द्वेषमूलक भाषा वापरणे थांबायला हवे. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीत अवमान, अवमूल्यन यांचा अतिरेक होऊ नये. सत्ताधारी आणि विरोधक यांनी खऱ्या अर्थाने राजधर्म निभवायला हवा.






























































