वेबसीरीज – खिळवून ठेवणारी ‘ज्युबिली’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> तरंग वैद्य

अंदाजे नऊ तासांची ही मालिका नुसतं आपलं मनोरंजनच करीत नाही, तर चित्रपट निर्मिती वाटते तेवढी सोपी नाही हे दाखवते. प्रेक्षक मायबाप असतात हे समजावते. फाळणीनंतर होत्याचं नव्हतं झालेल्यांची व्यथा, शून्यातून पुन्हा विश्व उभं करण्याची जिद्द…बरंच काही शिकवून जाते.

मनोरंजन- दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीपासून आपल्याला घरच्याघरी मनोरंजनाचा आनंद मिळू लागला. पुढे काळाप्रमाणे वाहिन्या वाढू लागल्या. पूर्वीच्या काळी रविवार संध्याकाळ दूरदर्शनवर दाखवल्या जाणाऱया हिंदी चित्रपटासाठी राखून ठेवलेली असायची तर आता अनेक अशा वाहिन्या आहेत ज्या फक्त चित्रपटच दाखवतात. तेही चोवीस तास. आता शेकडो वाहिन्यांवर प्रसारित होणाऱया हजारो सीरियल्सपलीकडे एक नवीन मनोरंजनाचे साधन आपल्या हाती आले आहे, ज्याला ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणतात. बरेच जण ‘ओटीटी’चा फुलफॉर्म काय या विचारात पडतात. ओटीटीचे पूर्ण स्वरूप किंवा फुलफॉर्म आहे ‘ओव्हर द टॉप.’ आता असं का याचे उत्तर माझ्याकडे नाही. कदाचित याचा सेट टॉप बॉक्स टीव्हीवर ठेवलेला असतो म्हणून असेल कदाचित. गमतीचा भाग वेगळा. तर इथे ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपण आपल्या देशातील विविध भाषांच्या परदेशी भाषेतील मालिका आपल्या सवडीनुसार बघू शकता आणि सांगायची गरजच नाही की, या मालिकांना वेब सीरिज असे नाव आहे.

वेब सीरिज – वेगवेगळे विषय, भन्नाट कल्पना. काही दिवसांपूर्वी असाच एक वेगळा विषय घेऊन एक वेब सीरिज बघितली. नाव – ‘ज्युबिली’. स्वातंत्र्य काळातील सिनेमा, सिनेमा कंपनी यावर बेतलेली कथा. पूर्वीचा काळ हुबेहूब उभा करायचा म्हणजे सोपं काम नाही. इथे कला दिग्दर्शकाला सलाम. त्याने दिग्दर्शकाच्या नजरेतला तो काळ उत्तमरीत्या दाखवला आहे. त्या काळातील ऑफिस, गाडय़ा, रस्ते, घरं, त्यातील सामान बघताना आपण तोच काळ जगत आहोत असं वाटतं. सिनेमा, त्याची निर्मिती, चित्रीकरण, त्यातील नटनटय़ां, फिल्मी पाटर्य़ांबद्दल सर्वसामान्याला पूर्वीपासून आकर्षण होतं आणि आजही आहे. प्रेक्षकांची ही आवड त्याला माहीत आहे हे लेखकांनी दाखवून दिले आहे. ‘ज्युबिली’चे मुख्य कथानक जरी चित्रपट निर्मितीवर आधारित असले तरी स्वातंत्र्याचा आनंदी काळ, फाळणीचे दुःख या सर्व बाबींचा उत्कृष्ट असा मिलाफ करून कथेला रंजक बनवले आहे.

दहा भागांची ही कथा असून प्रत्येक भाग पन्नास-बावन्न मिनिटांचा आहे, पण बघताना ‘कधी संपतोय’ असं न वाटता ’अरे संपला’ अशी प्रतिािढया येते आणि इथेच निर्माता-दिग्दर्शक जिंकतो. रिमोट हातात असलेल्या प्रेक्षकाला खिळवून ठेवणं म्हणजे सोप्पी गोष्ट नाही. इथे श्रेय कलाकारांचेही आहे. ’रॉय टॉकीज’चे मालक झालेले प्रसन्नजित चॅटर्जी यांनी आपल्या संयत अभिनयाने भूमिकेतील खरेपण जपले आहे. त्यांची बायको, व्यवसायातील भागीदार आणि अभिनेत्री असे तीन विविध पैलू अदिती रावने लीलया पेलले आहेत. अपारशक्ती खुराना यांनी कंपनीतला साधा कारकून ते सुपरस्टार हा प्रवास छान केला आहे. कमाल करून गेला आहे तो सिद्धांत गुप्ता, ज्याने जय खन्ना ही भूमिका निभावली आहे. फाळणीनंतर मुंबईतील रिफ्युजी कॅम्पमध्ये राहून अभिनेता-दिग्दर्शक बनायची स्वप्ने बघणारा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणारा जय खन्ना भाव खाऊन जातो. ‘ज्युबिली’ची कथा काल्पनिक आहे, पण त्या काळातील अनेक कलाकार, निर्मात्यांशी साधर्म्य दाखवते. 1934 मध्ये हिमांशू रॉय आणि देविकारानी यांनी ’बॉम्बे टॉकीज’ची सुरुवात केली होती. या कथेत ’रॉय टॉकीज’ आहे. बॉम्बे टॉकीजने कुमुद नावाच्या त्यांच्या लॅब सहाय्यकाला ’जीवन नैया’ या चित्रपटातून हिरो किंवा मुख्य नट म्हणून पुढे आणले होते, ज्यांना आपण अशोक कुमार या नावाने ओळखतो. या कथेत बिनोद मदनकुमार या नावाने हिरो बनतो. जय खन्ना आणि त्याचे वडील आपल्या नकळतच पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांची आठवण करून देतात. जयच्या वडिलांची भूमिका अरुण गोविल यांनी केली आहे. बऱयाच वर्षांनी त्यांना बघताना छान वाटतं. निलोफर, या कथेतील आणखी एक मुख्य पात्र, जी फाळणीच्या काळात लखनौच्या तवायफगृहातून मुंबईत येते आणि मोठी अभिनेत्री बनते. वामिका गब्बी हिने निलोफरचे सौंदर्य आणि स्वाभाविकता छानच सांभाळली आहे. या गुणी अभिनेत्रीला यापूर्वी मी ‘ग्रहण’या वेब सीरिजमध्ये बघितले आहे.

त्या काळातील चित्रीकरणाचे बारकावे, लोकांची बोलायची पद्धत, वितरकांची वागणूक, भांडवलदारांची वृत्ती, सर्व अगदी अचूक टिपले आहे. सिगारेट ओढणे आरोग्याला हानीकारक आहे हे आज आपल्याला समजून चुकले आहे, पण त्या काळी सिगारेट म्हणजे श्रीमंती आणि युवा वर्गासाठी आकर्षण. थोडक्यात, सिगारेट म्हणजे ’स्टेटस आणि स्टाईल’ आणि सिनेक्षेत्र म्हणजे पण स्टेटस आणि स्टाइल. त्यामुळे या मालिकेत सिगारेटचा वापरही खूप केला आहे, पण ते कुठेही खटकत नाही हे विशेष.

मुंबई आणि पाऊस हे एक वेगळेच समीकरण आहे. पावसातील दृश्ये छान चित्रित केली आहेत. वेब सीरिज किंवा वेब फिल्म म्हणजे यात शक्यतो सिनेमासारखी गाणी नसतात किंवा असलं तर एखादंच गाणं. ‘ज्युबिली’चा विषय चित्रपट असल्यामुळे यात गाणी तर आहेतच, पण तो काळ लक्षात घेता गाणी ही अशी तयार केली आहेत, जणू त्या काळातलीच आहेत. कर्णमधूर अशी ही गाणी मला तर आवडलीच, पण तुफान लोकप्रियही होत आहेत. म्हणजे इतरांनाही आवडत आहेत. हा संगीताचे ’अच्छे दिन’ यायचा संकेत तर नाही ना?

अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अंदाजे नऊ तासांची ही मालिका नुसतं आपलं मनोरंजनच करीत नाही, तर चित्रपट निर्मिती वाटते तेवढी सोपी नाही हे दाखवते. प्रेक्षक मायबाप असतात हे समजावते. फाळणीनंतर होत्याचं नव्हतं झालेल्यांची व्यथा, शून्यातून पुन्हा विश्व उभं करण्याची जिद्द…बरंच काही शिकवून जाते. भूतकाळातील रम्य आठवणींच्या कैदेतून बाहेर पडावेसे वाटले नाही, एवढी मला ही मालिका आवडली आणि सर्व वयोगटांतल्या प्रेक्षक वर्गालाही आवडेल अशी अपेक्षा आहे.

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)