
महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या कोयना धरण परिसरातील नागरिक आणि शेतकऱयांवर सध्या पाणीबाणीचे संकट ओढवले आहे. याच तालुक्यातील असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोयना विभागातल्या तहानलेल्या नागरिकांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना नदीवरील शिवसागर जलाशयाची पाणीपातळी नीचांकी स्तरावर गेली असून, 105 टीएमसी साठा असणाऱया या धरणात आज रोजी 31.10 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 33 टीएमसी पाणी होते. मात्र, पाऊस लवकर चालू झाल्याने पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. सन 2018 नंतर पुन्हा यावर्षी पाण्याची पातळी खालावली आहे. 105 टीएमसी पाणीसाठा असणाऱया कोयना धरणातून कर्नाटकसाठी जास्तीत जास्त पाणी विसर्ग झाल्याने 95 किलोमीटरचा बॅकवॉटर परिसर पूर्णतः कोरडा पडला आहे. कर्नाटकात व खाली धरणात पाणी सोडल्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी पाण्याचे नियोजन कोलमडल्यामुळे आत्ता पाण्याची भीषण अवस्था या भागात आहे. यावर्षी अल-निनोचा प्रभाव राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदा पाऊस लांबण्याची चिन्हे आहेत.
जावली-महाबळेश्वर तालुक्यांतील लोकांच्या त्यागावर कोयना धरण उभे राहिले आहे. धरणात पाणीच राहत नसल्याने जनजीवन विस्कळीत होत असून, शासनाने बोटचालकांना मदत करून अडचणीतून बाहेर काढावे, अशी मागणीदेखील स्थानिकांनी केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये पर्यटक यायच्या वेळेसच पाणी कमी झाल्याने बोट व्यवसाय अडचणीत आल्याने स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपातळी योग्य राखण्यासाठी नियोजन व्हायला हवे.
बोटिंग व्यवसाय ठप्प; आता पावसाची प्रतीक्षा
कोयना नदीला एखाद्या ओढय़ाची अवकळा आल्याने स्थानिक लोकांच्या पोटापाण्यासाठी असणारा बोटिंगचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पाणी कमी झाल्याने बामणोली, तापोळा, सोलशी, वानवली भागांतील नदीपात्र कोरडे पडले आहे. पर्यटकांना आनंद देणाऱया लाँच, स्पीड बोट, पायंडल बोट कोरडय़ा पात्रात विश्रांती घेत आहेत. नदीच्या मुख्य प्रवाहात थोडेफार पाणी असल्याने किरकोळ स्वरूपात बोटिंग सुरू आहे. नदी आटल्यामुळे या गावातून दुसऱया गावात जाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. मोठा पाऊस होऊन पाणीपातळी वर येईपर्यंत हा बोटव्यवसाय व लोकांचे दळणवळण थांबणार असल्याने लोकांना कोयनामाई भरण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

























































