
भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसने कर्नाटकात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेशाध्यक्ष आणि विजयात सिंहाचा वाटा असलेले डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह आणखी दोन नेत्यांची नावे चर्चेत असून काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे यांची त्रिसदस्यीय समिती नवनिर्वाचित आमदारांचा याबाबत कल जाणून तसा अहवाल हायकमांडला देणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण, याचा फैसला होणार असून 18 मे रोजी शानदार शपथविधी सोहळा होईल, असे सूत्रांनी सांगितले.
224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत 135 जागा जिंकत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले असून आता मुख्यमंत्री निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस हायकमांडने त्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, दीपक बाबरिया आणि जितेंद्र सिंह यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
म्हणून सिद्धरामय्या यांचे पारडे जड
डी. के. शिवकुमार यांचा कर्नाटकच्या विजयात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. मात्र, त्यांना मुख्यमंत्री केल्यास त्यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा पुन्हा ससेमिरा लावला जाऊ शकतो, अशी भीती काँग्रेस हायकमांडला आहे. त्यामुळेच हा धोका टाळण्यासाठी सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा देऊन शिवकुमार यांना नवीन सरकारमध्ये अन्य मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता काँग्रेस वर्तुळातून व्यक्त होत आहे.
18 मे रोजी शपथविधी
कर्नाटकमध्ये नव्या सरकारचा शपथविधी 18 मे रोजी होईल हे जवळपास निश्चित आहे. या सोहळ्याला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत.
जयनगरचा निकाल वादात
जयनगर जागेवर काँग्रेसने सौम्या रेड्डी, तर भाजपने राममूर्ती यांना उमेदवारी दिली होती. मतमोजणीवेळी गोंधळ झाला. त्यानंतर पुन्हा मतमोजणी झाली. त्यात राममूर्ती अवघ्या 16 मतांनी विजयी झाले. त्यानंतर शिवकुमार यांनी मतमोजणी केंद्राबाहेर धरणे आंदोलन केले. मतमोजणीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला.
काय शक्यता आहेत?
– सिद्धरामय्या यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित केले गेल्यास तीन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी दिली जाऊ शकते. वोक्कलिंगा समाजाचे शिवकुमार, लिंगायत समाजाचे एम. बी. पाटील, दलित समाजाचे जी. परमेश्वर असे हे तीन नेते असतील. त्यामाध्यमातून राज्यातील तिन्ही प्रमुख समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील.
– शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना समान न्याय देत अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे सूत्रही विचाराधीन आहे. त्यातही शिवकुमार यांना पाच वर्षे मुख्यमंत्रीपद दिल्यास सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री असतील व त्यांच्याकडे महत्त्वाचे खाते दिले जाईल.
मोदींना लोक कंटाळलेत -रमेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी थकत नसले तरी लोक मात्र आता थकले आहेत. कंटाळले आहेत. त्यांची ती भाषणबाजी आणि रोड शो लोकांना असह्य झाले आहेत. कर्नाटकात हेच पाहायला मिळाले, अशा बोचऱया शब्दांत काँग्रेस नेत जयराम रमेश यांनी निशाणा साधला. डबल इंजिनची बनवाबनवीही लोकांना कळली आहे. दिल्लीत बसून रिमोटवर राज्य चालवायचे हे लोकांना मान्य नाही, अशी तोफही रमेश यांनी डागली. बजरंग दल आणि बजरंग बली यांची तुलनाच होऊ शकत नाही. बजरंग दल द्वेष आणि हिंसाचाराचे राजकारण करत आले आहे आणि त्याबाबत कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्यानुसार कारवाईचे पाऊल सरकार उचलेले, असेही रमेश म्हणाले.
हा मोदींचा पराभव नाही -बोम्मई
भाजपच्या दारूण पराभवानंतर शनिवारीच बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रदेश भाजपची आज बैठक झाली. या बैठकीत पराभवावर मंथन करण्यात आले. बैठकीनंतर बोम्मई यांनी हा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नसल्याचा दावा केला. या पराभवाची अनेक कारणे आहेत. हा कुण्या एकटय़ामुळे झालेला पराभव नाही. पराभवाच्या कारणांवर विस्ताराने चर्चा केली जाईल. त्यासाठी लवकरच नवनिर्वाचित सदस्य आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली जाईल, असे त्यांनी सांगितले.
अंतिम निर्णय हायकमांडचा
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बंगळुरूतील हॉटेल शांग्रीला येथे पार पडली. या बैठकीत विधिमंडळ नेता निवडीचे सर्वाधिकार काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांना देण्याचा ठराव करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री कोण याचा निर्णय हायकमांड घेईल, असे आधीच अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे अंतिम निर्णय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाच असणार आहे.
– मुख्यमंत्रीपदासाठी डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची नावे आघाडीवर आहेत. त्यासोबतच एम. बी. पाटील आणि जी. परमेश्वर यांचीही नावे चर्चेत आहेत. शिवकुमार यांना 68 तर सिद्धरामय्या यांना 59 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. 8 आमदारांनी परमेश्वर यांच्यासाठी आग्रह धरला आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे पोस्टर्स शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी लावले आहेत.
केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे तातडीने रविवारी विशेष विमानाने बंगळुरूत दाखल झाले. मुख्यमंत्रीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते बंगळुरूमध्येच राहणार आहेत.
























































