Karnataka CM decision ‘एकतर मला मुख्यमंत्री करा किंवा…’, शिवकुमार यांची खरगेंकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र मुख्यमंत्रीपदावरून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले तरीही काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. तसेच राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावाही करण्यात आला नाही.

मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम असताना मंगळवारी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. सिद्धरामय्या यांनी पहिली दोन वर्ष स्वत:ला तर पुढची तीन वर्ष शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याचा फॉर्म्युला मांडला. तर दुसरीकडे शिवकुमार यांनीही मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 2019 मध्ये सरकार कोसळल्यापासून शिवकुमार यांनीच काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचे शिवधनुष्य उचलले होते आणि त्यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमतापेक्षा जास्त जागाही जिंकून दिल्या.

मुख्यमंत्रीपद नाकारलं तर…

खरगे यांच्या भेटीदरम्यान शिवकुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली. सिद्धरामय्या यांनी याआधीही कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यामुळे यावेळी आपल्याला मुख्यमंत्री बनवण्यात यावे. मुख्यमंत्रीपद नाकारल्यास पक्षात आपण फक्त आमदार म्हणून काम करू असेही त्यांनी खरगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

…त्यानंतर अंतिम निर्णय

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दोघे प्रमुख दावेदार आहेत. पण या दोन नेत्यांच्या पाठीशी असणाऱ्या आमदारांची संख्या आणि मुख्यमंत्री निवडीबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी सायंकाळी शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा केली. या दोघांशी झालेल्या चर्चेचा तपशील खरगे सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना देणार आहेत. त्यानंतरच मुख्यमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

लवकरच निर्णय

राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांनी सिद्धरामैय्या यांना पाठिंबा दिला आहे, तर सोनिया गांधी डी.के. शिवकुमार यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अद्याप निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. सर्व नेत्यांशी चर्चा करूनच ते एका नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यासाठी आज दुपारी 11 वाजता एका बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे.

स्पष्ट बहुमत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. भाजपचा पराभव करत काँग्रेसने येथे स्पष्ट बहुमत मिळवले. कर्नाटकमध्ये 113 ही मॅजिक फिगर आहे. सध्या काँग्रेसकडे 135 एवढे संख्याबळ असून भाजपला 65 जागांवर समाधान मानावे लागले.