
उष्णतेच्या कडाक्याने अंगाची काहीली होत आहे. त्यामुळे एकीकडे विजेचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे.पंख्ये, एसी या कृत्रीम गारवा निर्माण करणा-या नेहमीच्याच यंत्राना बगल देत स्थानिक रहीवाशांनी आता बांधतिवरे नदी पात्रात उतरून उन्हाच्या काहीलीची तृष्णा क्षमविण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे बांधतिवरे नदीवर स्नान करणा-यांची गर्दी वाढली आहे.
दापोली शहरातून उगम पावलेल्या आणि आंजर्ले खाडीला जावून मिळणा-या या नदीला जोग नदी असे संबोधले जाते. ही नदी दापोली, मौजे दापोली, बांधतिवरे, ताडील, सारंग, कळंबट, म्हैसोंडे,वाघवे,कोंगळे, अडखळ, मुर्डी आदी गावाकडून आंजर्ले गावातील खाडीला जावून मिळते. या नदीचे पाणी हे जरी गोडे असले तरी आंजर्ले खाडीचे खारे पाणी हे कोंगळे ताडीलपर्यंत येत असल्याने ते खारे पाणी होते.
बांधतिवरे येथील स्पाॅट हा पर्यटनदृष्टया अतिशय महत्वाचा असा स्पाॅट असून या बांधतिवरे गावाच्या हद्दीतून वाहणारी ही जोग नदी संथगीतीने वाहत असल्याने या ठिकाणी पाण्याने खुपच मोठा परिसर व्यापला आहे. अशा या ठिकाणी नदीच्या दोन्ही बाजूला वन विभागाचे राखीव जंगल आहे. अतिशय शांत निसर्गरम्य अशा हिरव्यागार निसर्गाने नटलेला रमणीय परिसर असून याच ठिकाणी हर्णे पाजपंढरी अडखळ शिवाजीनगरची पाणी योजना आहे. या ठिकाणी बांधतिवरे नावाचा नदीवर मोठा पुल असून या पुलाखालून वाहणारे नदीचे स्वच्छ पाणी सतत वाहत असते. पूर्णपणे सपाट भाग असल्याने या बांधतिवरेतून नदी अगदी संथगीने वाहते. येथे नदीत उतरण्यास कोणताच धोका नाही त्यामुळे दापोली शहरासह अनेक ठिकाणच्या गावातील लोक हे खास पोहण्यासाठी बांधतिवरे नदीवर येत असतात.
हा परिसर जर वन विभागाने विकसित केला तर हे ठिकाण पर्यटकांसाठीचे खास आकर्षणाचे ठिकाण होईल. अशा या ठिकाणी स्थानिकांनी उन्हाच्या कडाक्याच्या काहीली घालविण्यासाठी एकच गर्दी केली होती. स्थानिकांनाच उष्णतेचा कहर सहन होत नसल्याने झाल्याने ते आपल्या मुलाबाळांसह पोहण्यासाठी खास बांधतिवरे नदीवर दाखल होत आहेत.

























































