काँग्रेसने दिलेला शब्द पाळला, कर्नाटकात मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ‘फाईव्ह गॅरंटी’ मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
siddaramaiah

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ‘फाईव्ह गॅरंटी’चा दिलेला शब्द पाळला आहे. शपथविधीनंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पाच आश्वासनांच्या पुर्ततेचा ठराव मंजुर करण्यात आला. यासंदर्भात लगेच आदेशही काढण्यात आला असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

बंगळुरूतील श्रीकांतीविरा स्टेडियमवर आज कर्नाटकातील नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधिमंडळात नूतन मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली पाच आश्वासने मंजूर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यासंबंधीचा आदेशही काढण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना दिली.

पत्रकारांशी संवाद साधताना सिद्धरामय्या यांनी अगोदरच्या भाजप सरकारवर जोरदार टीका केली. अगोदरचे बोम्मई सरकार निरूपयोगी होते. केंद्राकडून कराचा वाटा आणण्यातही बोम्मई सरकार कमी पडले. वित्त आयोगानुसार केंद्राकडे राज्याचे साडेपाच हजार कोटी रुपये थकले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या राज्यसभेवर कर्नाटकातून निवडून गेल्या आहेत. पण काही उपयोग नाही, असा टोलाही सिद्धरामय्या यांनी लगावला.

कर्नाटकातील जनतेला मिळणार ही ‘फाईव्ह गॅरंटी’

‘गृहज्योती’ योजनेअंतर्गत प्रत्येक घरासाठी २०० यूनीट वीज मोफत
‘गृहलक्ष्मी’ योजनेअंतर्गत कुटुंबप्रमुख असलेल्या महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये देणार
‘युवानिधी’ योजनेअंतर्गत पदवीधर आणि पदविकाधारक बेरोजगार तरुणांना भत्ता
‘उचित प्रयत्न’ योजनेच्या माध्यमातून महिलांना राज्य परिवहन विभागाच्या बसमध्ये मोफत प्रवास
‘अन्नभाग्य’ योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेच्या खालील कुटुंबाला १० किलो धान्य मोफत

काही तासांत…
कर्नाटकातील मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही तासांत तुम्हाला आनंदाची बातमी कळेल असे सूचक वक्तव्य केले होते. आमही खोटी आश्वासने देत नाही, जे बोलतो ते करून दाखवतो. जाहीरनाम्यात आम्ही दिलेली आश्वासने पहिल्याच कॅबिनेटमध्ये पूर्ण होतील असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला होता.