
पुणे मेट्रोसाठी बिहारमध्ये भरती होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सिव्हिल इंजिनीअर पदांसाठी ही भरती होत असून यासाठी पाटण्यात 26 आणि 27 मे रोजी मुलाखती होणार आहेत. महाराष्ट्रातील नोकऱ्या अशा प्रकारे परप्रांतीयांच्या घशात घातल्या जात असल्याने याविरुद्ध सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
टाटा प्रोजेक्ट्स कंपनीकडून पुणे मेट्रोची उभारणी करण्यात येत आहे. या प्रोजेक्टमधील मेट्रो लाइन 3 साठी सिव्हिल इंजिनीअर पदांची भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीची पूर्ण प्रक्रिया बिहारची राजधानी पाटण्यात ठेवण्यात आली आहे. पुणे मेट्रोसाठी ही नोकरभरती असताना याबाबत महाराष्ट्रात कोणतीही जाहिरात न देता थेट बिहारमध्ये अर्ज मागवण्यात आले आहेत.
मराठी मुलांसाठी वॉचमन, सफाई कामगाराच्या नोकऱ्या
मोठे उद्योगधंदे आले तर कोकणात रोजगार येईल म्हणताय? मग हे बघा. पुणे मेट्रोची भरती बिहारमध्ये का होतेय? म्हणजे वॉचमन, सफाई कामगार, ड्रायव्हर अशा पदांसाठी स्थानिक उमेदवार आणि चांगल्या पदांची भरती परराज्यातून हे उघड झाले आहे, अशी पोस्ट एका फेसबुक युजरने केली आहे.
ईडी सरकारची तीन लाख नोकऱ्यांची वल्गना आणि…
राज्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात केली. त्याचा उल्लेख करत महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी बिहारमध्ये भरती होत असताना तुम्ही काय करत आहात? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.
सिव्हिल इंजिनीअर पदांसाठी ही भरती होत आहे. यासाठी जॉबशी संबंधित विविध अटी व नियम नमूद करण्यात आले असून 7 ते 12 वर्षे अनुभव असावा, असे म्हटले आहे. 26 आणि 27 मे रोजी पाटण्यात मुलाखती घेण्यात येणार असून आतापर्यंत जवळपास 900 अर्ज आले आहेत.
उद्योग पळवले, आता नोकऱ्याही पळवताहेत!
ईडी सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातून उद्योगांची पळवापळवी सुरू झाली. वेदांता समूहाचा तब्बल 1.54 लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता, मात्र हा प्रकल्प गुजरातला देण्यात आला. त्यानंतर आणखीही मोठे प्रकल्प इतर राज्यांकडे वळवण्यात आले. त्यामुळे आधीच हजारो नोकऱ्या हिरावल्या गेल्या असताना आता येथील चांगल्या नोकऱ्यांसाठी परप्रांतीयांना दारे उघडी केली गेल्याने बेरोजगार मराठी तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.

























































